लोणावळा बाजारपेठेत रानमेव्याची मोठी आवक…

0
47

लोणावळा : लोणावळा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर रानमेव्याची आवक झाली आहे . रायवळ आंबे , करवंद , आवळे , जांभळे , फणस यांची आवक वाढल्याने अनेकांना रोजगार मिळाला आहे .

लोणावळा शहरात एक मोठी बाजारपेठ असून याठिकाणी ग्रामीण व डोंगरी भागातून आदिवासी लोक सध्या रानमेवा विक्रीस आणत आहेत . रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी स्थानिकांप्रमाणे पुणे , मुंबई येथील पर्यटकही बाजारपेठेत रानमेवा खरेदी करत आहेत . यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आदिवासी व दुर्गम भागातील अनेक कुटुंबे मे महिन्याच्या अखेरीस जंगलातील परिपक्व रानफळे शहरी भागात विक्री करून उदरनिर्वाह चालवत असतात . विशेषत : जांभळाला किलोला दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे यंदा किलोला दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे . यंदा कमी उत्पादन असले तरी येथील आदिवासी कुटुंबांचे अर्थचक्र पुन्हा सुरु झाल्याने आदिवासी व्यापाऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे तसेच खवय्यांचीही तृप्ती होत आहे .

मोठ्या प्रमाणावर जंगलतोडीमुळे तसेच एप्रिल व मे महिन्यात उर्वरित जंगलात वणवे लागल्याने रानफळे देणाऱ्या झाडांची संख्या घटली आहे . याचा परिणाम रानफळांच्या उत्पादनावर झाला आहे .रानफळे देणारी झाडे ही आकाराने लहान व उंचीने कमी असल्याने त्यांचा वणव्यामध्ये अधिक बळी जातो . यंदाचा कडक उन्हाळा , हवामानात वारंवार होणाऱ्या बदलामुळे यंदा करवंदे , जांभळे , रायवळ आंबे , फणस यांचे उत्पादन 70 ते 80 टक्के घटले आहे . उशिराने जी काही अल्प प्रमाणात रानफळे झाडावर लागली आहेत , ती बदलत्या वातावरणामुळे अजूनही परिपक्व झालेली नाहीत त्यामुळे हा रानमेवा सहज उपलब्ध होणे कठीण असून त्याचा अस्वाद घेण्यासाठी बाजारपेठेत मोठया प्रमाणात याची खरेदी होत आहे.