लोणावळा (प्रतिनिधी): एस टी स्टॅन्ड परिसरात हरवलेल्या 12 वर्षीय मुलाला अमोल शेडगे यांनी ताब्यात घेऊन सुखरूप पेण, रायगड पोलिसांच्या स्वाधीन केले.
प्रणव प्रविण देशमुख (वय 12 वर्ष, रा.वाक्रोळ फाटा ,पेण रायगड ) असे या मुलाचे नाव असून हा लहान मुलगा दि.9 रोजी दुपारच्या वेळेस लोणावळा एस टी स्टॅन्ड परिसरात महाराष्ट्र खानावळ समोर बराच वेळ एकटाच उभा असल्याचे अमोल शेडगे यांच्या लक्षात येताच त्यांनी दोन पाऊल पुढे सरसवात त्या बालकास विचारपूस केली.
त्याच्याशी संवाद साधल्या नंतर तो हरवला असल्याचे लक्षात आले. त्यावेळी शेडगे यांनी त्यास आपल्या घरी नेवून त्याची खातीरदारी करून त्याला धीर दिला. व याबाबत लोणावळा शहर पोलिसांना माहिती देऊन पोलीसांमार्फत पेण पोलीसांशी संपर्क करण्यात आला.
नंतर त्या बालकास शेडगे यांनी स्वतः लोणावळा येथून एक पोलीस कर्मचारी सोबत घेऊन सुखरूप पेण पोलीस स्टेशनच्या महीला पोसई घाडगे यांच्या स्वाधीन करून लोणावळा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अमोल शेडगे यांनी माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण दिले आहे.त्यांच्या सतर्कतेमुळे आज एक अल्पवयीन मुलगा आपल्या परिवारापासून दुरावताना बचावला गेला आहे.शेडगे यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.