लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफार्म क्रमांक 2 वरील सार्वजनिक स्वच्छतागृह महीला व पुरुष हे बंद असून ते त्वरित सुरु करण्यासाठी लोणावळा शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने रेल्वे प्रशासनास निवेदन देण्यात आले.
मागील 4 ते 5 दिवसांपासून प्लॅटफार्म क्रमांक 2 वरील सार्वजनिक स्वच्छतागृह बंद आहे व दुरुस्तीसाठी आणखी अनेक दिवस बंद राहणार असल्याची माहिती मिळाली असून त्या कालावधीत लोणावळा शहरातील नागरिकांची व शहरात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण तात्पुरत्या स्वरूपात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारून नागरीकांची सोय करून द्यावी असे निवेदन डी आर एम, सी सी आय स्टेशन मॅनेजर लोणावळा रेल्वे स्टेशन यांना देण्यात आले आहे.
यावेळी लोणावळा शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा उमा राजेश मेहता,महिला कार्याध्यक्षा संयोगीता नामदेव साबळे,पूर्वा गायकवाड, आरोही तळेगावकर,राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर अध्यक्ष विलास बडेकर, उद्योजक राजेश मेहता आदींसह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.