लोणावळा हद्दीत महामार्गावर वाढत्या अपघातांसंदर्भात पोलीस व सर्वपक्षीय बैठक संपन्न…

0
390

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना संदर्भात लोणावळा शहर पोलीस, एम एस आर डी सी, आय आर बी व लोणावळा शहरातील सर्व पक्षीय अध्यक्ष व प्रतिनिधी यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मागील पंधरा दिवसांत अनेक अपघात झाले आहेत. आणि त्यामध्ये अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे, अनेक परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ही अपघाताची मालिका रोखण्यासाठी उपाययोजना संदर्भात या सर्वस्तरीय बैठकीचे आयोजन लोणावळा शहर पोलीस ठाण्याकडून करण्यात आले होते.

लोणावळा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणारी अवजड वाहने या अपघातांना कारणीभूत असून या वाहनांना शहरातून वाहतूक करणे कायमचे बंद व्हावे यावर महत्वाची चर्चा करण्यात आली.

वरसोली टोलनाक्यावर टोल भरल्यानंतर अवजड वाहनांना द्रुतगती मार्गावर प्रवेश करताना पुन्हा एक किमी अंतरावर असलेल्या कुसगाव टोलनाक्यावर दुसऱ्यांदा टोल भरावा लागत असल्याने अनेक अवजड वाहनांचे चालक टोल वाचविण्यासाठी लोणावळा शहरातून वाहने घेऊन जात असल्याने शहरात अपघात व वाहतूककोंडीचे प्रमाण वाढले आहे . याकरिता वरसोली टोलनाक्यावर टोल भरल्याची पावती द्रुतगती मार्गावरील कुसगाव टोलनाक्यावर ग्राह्य धरण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीच्या विरोधात सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोणावळा शहरातील राजकीय पक्षांनी दिला आहे.

मागील काळात राष्ट्रीय महामार्गावरील टोलची पावती द्रुतगती मार्गावर ग्राह्य धरली जात होती . आता मात्र यामध्ये मागील काही महिन्यांपासून अचानक बदल करत ती पावती ग्राह्य धरणे बंद केल्याने वाहनचालकांना डबल टोल भरावा लागतो आणि हा डबल टोल वाचविण्यासाठी वाहन चालक लोणावळा शहरातून प्रवेश करतात त्यामुळे अपघात व वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना कारणीभूत ठरतात.लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांमध्ये अपघातांचे सत्र वाढले आहे . या अपघातांना अवजड वाहने जबाबदार आहेत तसेच गवळीवाडा नाका परिसरात लावण्यात आलेले दगडी दुभाजक खराब झाले असल्याने वाहने कोठूनही आत बाहेर होत असल्याने अपघात वाढले आहेत . यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी सर्वपक्षीय मंडळींनी केली होती.

लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आज लोणावळा नगरपरिषदेत सर्व पक्षीय मंडळी तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ , आयआरबी कंपनी , लोणावळा नगरपरिषद , पोलीस अधिकारी , पत्रकार मित्र,व्यापारी संघटना यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.

यावेळी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, शिव सेना शहराध्यक्ष बाळासाहेब फाटक , आरपीआय शहराध्यक्ष कमलशिल म्हस्के , राष्ट्रवादी महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ , व्यापारी आघाडी अध्यक्ष दिलीप गुप्ता , माजी उपनगराध्यक्ष भरत हारपुडे , नारायण पाळेकर , राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष राजु बोराटी , महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उप अभियंता प्रेरणा कोटकर , आयआरबीचे देखभाल दुरुस्ती प्रमुख पी.के.शिंदे , रमेश माने , कैलास पाटील , नंदकिशोर , अभय पावलझ आदी या बैठकीला उपस्थित होते.

पुढील आठ दिवसात रस्ता दुभाजका बाबत सकारात्मक निर्णय घ्यावा तसेच टोल पावती बाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठवत निर्णय घ्या अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून रस्ते विकास महामंडळाला देण्यात आल्या आहेत.