
लोणावळा दि.20: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
मागील अनेक वर्ष सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला लोणावळा नगरपरिषदेचा डॉ. बाबासाहेब डहाणूकर दवाखाना 2005 सालापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभावी बंद पडला आहे. लोणावळा व परिसरातील नागरिकांना नाममात्र दरात सेवा देणारा हा दवाखाना अखेर शासनाकडे वर्ग करण्याचा ठराव लोणावळा नगरपरिषदेणे करत सदर ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याचा प्रयत्न सुरु केला.
तसेच अनेक वर्षांपासून लोणावळ्यात शासकीय रुग्णालय असावा अशी नागरिकांची मागणी होती. याकरिता लोणावळा नगरपरिषदेने विशेष ठरावाद्वारे हा दवाखाना व सदर जागा शासनाकडे विनामोबदला हस्तांतरित केली याठिकाणी पुन्हा उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणार अशी अनेक वर्ष चर्चा सुरु होती परंतु काही तांत्रिक अडचणी व निधी नसल्यामुळे हे काम रखडले होते.
लोणावळा शहराच्या नावाला शोभेल असे सुंदर रुग्णालय उभारण्यासाठी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी शासनाच्या माध्यमातून या रुग्णालयासाठी 41 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि आज ह्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके,एस आर पी अध्यक्ष रमेश साळवे, शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर इत्यादी पदाधिकाऱ्यांसमवेत मावळातील तसेच लोणावळ्यातील कार्यकर्ते आणि नगरसेवक नगरसेविका व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.