Friday, August 8, 2025
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात फिरत गांजा विकणारा आरोपी अटकेत; दोन किलोहून अधिक साठा जप्त..

लोणावळ्यात फिरत गांजा विकणारा आरोपी अटकेत; दोन किलोहून अधिक साठा जप्त..

लोणावळा : ( प्रतिनिधी ) शहरात फिरून गांजा विकणाऱ्या अब्दुल करीम शेख या आरोपीस लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ किलो ७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल करीम शेख राहणार ( गृहवस्ती कुसगाव ) हा लोणावळा शहरातील विविध भागांत गांजाची होम डिलिव्हरी करत असल्याची माहिती पोलिसांच्या डीबी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याच्यावर पाळत ठेवत सापळा रचला आणि गांजासह त्याला रंगेहाथ अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. काही दिवसांपूर्वी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शहरात सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर अल्पावधीतच पोलिसांनी ही प्रभावी कारवाई करत मोठा गुन्हा उघडकीस आणला.

या प्रकरणाचा तपास एपीआय संतोष जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला असून, आरोपीकडून गांजाचा साठा कुठून आला, कोणाकडे विकत होता, यामध्ये आणखी कोणी सामील आहे का, याचा तपास सुरू आहे. आणखी एक साथीदार फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, माननीय न्यायालयाने आरोपी अब्दुल करीम शेख यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील तपास अधिक सखोल केला जात आहे.

ही कारवाई अंमली पदार्थविरोधातील मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, लोणावळ्यात अशा प्रकारच्या विक्रीला आळा बसवण्यासाठी पोलीस दल सजग आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page