लोणावळ्यात बेपत्ता अभियांत्याचा चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर सापडला मृतदेह…

0
84

लोणावळा : लोणावळ्यातील ड्युक्स नोज येथील घनदाट जंगलात बेपत्ता झालेल्या दिल्लीच्या तरुणाचा मृतदेह आढळला आहे . फरहान शहा असे मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे . रस्ता शोधत असताना 300 ते 400 फुटांवरून दरीत कोसळला असल्याचं प्रथमदर्शी लोणावळा शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.गेल्या चार दिवसांपासून फरहानचा पोलीस , शिवदुर्ग रेस्क्यू टिम, कुरवंडे गावचे ग्रामस्थ शोध घेत होते . फरहान हा मूळ दिल्लीचा राहणारा आहे.

त्याचा शोध घेणाऱ्यास त्याच्या कुटुंबाने 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं . मंगळवारी ( 24 मे ) अखेर आयएनएस शिवाजी येथील जवानांना दरीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली .यानंतर एनडीआरएफचे ( NDRF ) पथक दरीत उतरले. त्यावेळी तो मृतदेह फरहानचा असल्याचं निष्पन्न झाले , अशी माहिती लोणावळा शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी दिली.शुक्रवारी तो पुण्यात आला . तिथून तो लोणावळा परिसरात फिरण्यासाठी गेला.

नागफणी पॉईंट येथे तो एकटाच गेला . परंतु , रस्ता चुकल्याने तो परत येऊ शकला नाही . त्याने याबाबत भाऊ , आई , वडिलांना फोन करून माहिती दिली होती . कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली . लोणावळा शहर पोलीस त्याचा शोध घेत होते . फरहानचा मोबाईल बंद येत असल्याने शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते . शिवदुर्ग रेस्क्यू टीम , पोलिसांचं पथक , डॉग स्कॉड , ड्रोन , कुरवंडे गावचे ग्रामस्थ , खोपोली रेस्क्यू टीम हे सर्व त्याचा शोध घेत होते . आज NDRF चे पथक देखील त्याच्या शोधासाठी दाखल झाल होते . घनदाट जंगलात मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेणाऱ्यास एक लाखांच बक्षीस जाहीर केले होते .

दुर्दैवाने आज त्याचा मृतदेह आढळला आहे . रस्ता मिळेल या आशेने फरहान धबधब्याच्या दिशेने खाली येत होता . तेव्हा , तो 300 ते 400 फुटांवरून खाली कोसळला . यात त्याचा मृत्यू झाला , अशी माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी दिली.