
लोणावळा ट्राफिक वार्डन कडून स्थानिकांना अरेरावीची भाषा,चहा पेक्षा किटली गरम…
लोणावळा ( प्रतिनिधी ): ऐन रक्षाबंधन च्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील कायदा, सुव्यवस्था तसेच शहरातील वाहतूक कोंडीचे उत्तम नियोजन लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल व लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
शहरातील एकेरी वाहतूक नियोजन करताना छत्रपती शिवाजी चौक, परमार हॉस्पिटल चौक व भांगरवाडी इंद्रायणी पूल या भागात पोलीस, होमगार्ड व वार्डन यांचे योग्य नियोजन करण्यात आल्याने बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडीची समस्या सध्या कमी झाली असल्याचे मत लोणावळेकरांकडून व्यक्त करण्यात येत असताना परमार चौक येथील बालाजी बॅग हाऊस येथे ड्युटीवर असणाऱ्या वार्डन मराठे यांच्याकडून मात्र नागरिकांबरोबर गैर वर्तणूक होत असल्याचे नागरिकांकडून समजत आहे.
वार्डन मराठे हे नागरिकांशी अरेरावी करत असून गलिच्छ भाषेत वार्ता करत असून हे स्थानिक प्रशासनासाठी लज्जास्पद बाब आहे. सर्व प्रशासकीय स्तरावर शहरात योग्य नियोजन होत असताना एखाद्या वार्डन कडून असे कृत्य होणे म्हणजे पोलीस व नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात स्थानिकांच्या मनात नाराजी निर्माण होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तरी ही महत्वाची बाब लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी यांनी वार्डन मराठे यांना सेवा निवृत्ती दयावी असे यावेळी नागरिकांकडून सांगण्यात आले.