Saturday, September 21, 2024
Homeपुणेमावळलोहगड किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा…

लोहगड किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा…

मावळ (प्रतिनिधी) : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने लोहगड किल्ल्या वर दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्री . शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच तसेच , लोहगड , घेरेवाडी , भाजे व पाटण ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी किल्ले लोहगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात येतो . यावर्षी देखील मोठ्या उत्साहाने लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवस्मारकावर सुंदर रांगोळ्या व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली . यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून भारत माता पूजन करण्यात आले .
याप्रसंगी टाटा मोटर्सचे कर्मचारी भालकेश्वर यांच्या वतीने आपत्कालीन कार्याबद्दल शिवदुर्ग मित्र लोणावळा यांचा विशेष सत्कार करण्यात आला . हा सत्कार सुनिल गायकवाड व त्यांच्या इतर सदस्यांनी स्वीकारला . नंतर शिवस्मारक परिसर व लोहगड किल्ल्याच्या पायऱ्यांवर हजारो दिवे लावण्यात आले होते . त्यामुळे पौर्णिमेच्या चांदण्याबरोबर लोहगड किल्ल्याचा परिसर उजळून निघाला होता . सर्व परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता.
या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते . वि.का.सो.चे चेअरमन गणेश धानिवले , सरपंच नागेश मरगळे , उपसरपंच गणपत ढाकोळ , पोलीस पाटील सचिन भोरडे , रमेश बैकर , राजू शेळके , शत्रुघ्न बैकर , बाळू ढाकोळ आदी मान्यवर उपस्थित होते . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे , मार्गदर्शक संदीप गाडे , अध्यक्ष विश्वास दौंडकर , कार्याध्यक्ष सागर कुंभार , सोमनाथ बैकर , महेंद्र बैकर , तसेच , पिंपरी चिंचवड व कामशेत शहर गॅरेज असोसिएशनचे सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच मावळ तालुक्यातील शेकडो शिवभक्त या दिपोत्सवासाठी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page