वडिलांचा खून करून फरार आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केली अटक !

0
1158

लोणावळा : वडिल व मुलगा यांच्यात झालेल्या भांडणानंतर मुलानेच वडिलांचा गळा आवळून खून केला व पलायन केले होते . याबाबत मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पवनानगर विभागातील जवण नं . 3 या गावामध्ये दि . 14 जुलै ते 17 जुलै दरम्यान ही घटना घडली होती . या घटनेतील मयत व्यक्ती खंडू उर्फ गोट्या भिकाजी गिरंजे ( वय 60 , रा . जवण नं . 3 , पवनानगर , ता . मावळ ) यांची व त्यांचा मुलगा शेखर खंडू उर्फ गोट्या गिरंजे ( वय 35 , रा . खडकपाडा , कल्याण पश्चिम , जि . ठाणे , मूळ राहणार जवण नं . 3 ) यांच्यात दारु पिऊन झालेल्या भाडणांमध्ये शेखर याने वडिल खंडू उर्फ गोट्या गिरंजे यांचा गळा आवळून खून केला असल्याची फिर्याद सखाराम भिकाजी गिरंजे ( वय 67 , रा . जवण नं . 3 ) यांनी दिली होती .

सदर फिर्यादीच्या आधारे व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ .अभिनव देशमुख , अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे , लोणावळा उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने , सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे , पोलीस अंमलदार संतोष शेळके , नितिन कदम , शरद जाधवर , केतन तळपे , संदीप बोराडे , प्रविण उकिर्डे यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने शेखर यास विश्वासात घेऊन तपास केला असता , त्याने गुन्ह्याची कबुली दिली . याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने पुढील तपास करत आहे.