विज्ञानाला जन्मच भगवान गौतम बुद्ध यांनी दिला – पोंगाडे महाराज..

0
233

कर्जतमध्ये भीम महोत्सव – २०२२ ला प्रचंड जनसमुदाय…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जतमध्ये पोलीस मैदानावर प्रचंड जनसमुदाय जमून साजरा झालेला भीम महोत्सव – २०२२ हा ” न भूतो , न भविष्यती “असा पहाण्यास मिळाला.सर्वत्र निळे वातावरण ,आंबेडकर अनुयायी व बहुजन वर्गांचा उत्साह , ज्वलंत विचार व चिमुकळ्यांचा नृत्य , तर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध झालेली तरुणाई , या वातावरणात विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होऊन “भीम महोत्सवाचा “आवाज फटाक्यांच्या आतिषबाजीत तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला.

यावेळी या महोत्सवाचे अध्यक्ष हिरामण गायकवाड व कमिटी तसेच माजी नगराध्यक्षा सौ .रजनीताई गायकवाड यांच्या शुभहस्ते भगवान गौतम बुध्द व छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतिबा फुले ,छत्रपती शाहू महाराज ,घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या महोत्सवास सुरुवात झाली. सत्यशोधक मूलनिवासी संत पोंगाडे महाराज यांचा सत्कार सर्व जयंती कमिटी तर्फे करण्यात आला.

अरुण अभंगे यांचे गीत झाल्यावर योगेश गायकवाड यांचे प्रस्तावना पर जोशयुक्त भाषण झाले , अतिथी आणि अनुष्का या विद्यार्थिनींनी नृत्य सादर करून वाहवा मिळविली.यावेळी पोंगाडे महाराज म्हणाले की ,जयंती करण्याचे खूप मोठे उद्दिष्ट असते , म्हणून तर महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली व त्यांची जयंती साजरी केली , अन्यथा त्यांची जयंती आपण विसरलो असतो. महापुरुषांना नुसतं समजून घेणं गरजेचं नाही तर त्यांच्या कार्यात अडथळे येणारे कोण आहेत हे शोधून काढणे गरजेचे आहे , यावर प्रकाश टाकत समस्त बहुजनांना बाबासाहेबांनी मनुस्मृती वाचून सांगितले व त्याचे दहन केले.

आज बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासनकर्ते जमात होणे गरजेचे आहे ,असा संदेश त्यांनी याप्रसंगी दिला , तर आजही घटनेची अंमलबजावणी १०० टक्के होत नाही . ” ये आझादी झुटी है ,देश की जनता भुकी है “,असे अण्णाभाऊ साठे म्हणाले होते ,आजही तीच परिस्थिती आहे , आपल्या बहुजन समाजात जागृती नाही ,बुद्धांच्या युगात जगातील तरुण शिक्षण शिकण्यास भारतात येत होते ,नालंदा ,तक्षशिला , अशी महाविद्यालये होते,त्या वेळी विज्ञान नव्हते तर आज बुद्धांच्या विचारांवर विज्ञान आहे ,विज्ञानाला जन्मच त्यांनी दिला ,असे पोंगाडे महाराज यांनी सांगितले.

ओबीसी समाजात गैरसमज आहे की , बाबासाहेबांनी बौद्धांनाच अधिकार-आरक्षण दिले ,मात्र या समाजाला आपण बाबासाहेब व त्यांचे कार्य सांगण्यास कमी पडलो ,असे ठसठशीत जोशयुक्त मत त्यांनी व्यक्त केले.याप्रसंगी विद्यार्थिनी कांबळे हिने ” मला तुझ्या रक्तामधला भीमराय पाहू दे ” यावर उत्कृष्ट डान्स सादर केला . कर्जत खालापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ थोरवे , कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी , माजी नगराध्यक्ष राजेशदादा लाड , माजी उपसभापती मनोहरदादा थोरवे , त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे , गीतकार मुकुंद सोनावणे यांचा सत्कार जयंती कमिटीच्या वतीने करण्यात आला . तर प्रणित सोनावणे यांनी मिलिंद शिंदे यांचे स्वहस्ते काढलेले चित्र अर्पण केले.


यावेळी आपल्या दमदार मधुर आवाजात ” दोन च राजे इथे गाजले ,कोकण पुण्यभूमीवर , एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर ….., उद्धरली कोटी कुळे , भीमा तुझ्या जन्मामुळे…. , सुज्ञानाचा निर्मल झरा ,भीमा सारखा माणूस खरा , जन्मा येईल का….,राजा राणीच्या जोडीला….असे एक ना अनेक गीतांनी प्रचंड जनसमुदाय मंत्रमुग्ध होऊन गेला ,तर तरुणाई गीतांच्या तालावर थिरकत हा भीम महोत्सव – २०२२ मोठ्या उत्साहात साजरा झाला.