Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडवीज नाही , अशी बतावणी करून कर्जतकरांची पाण्यासाठी पिळवणूक..

वीज नाही , अशी बतावणी करून कर्जतकरांची पाण्यासाठी पिळवणूक..

पालिकेच्या उदासीन कारभाराविरुद्ध गणेशोत्सवा नंतर संतापजनक आंदोलन उभं करणार – ऍड. कैलास मोरे..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराची आत्ता ” हद्द ” झाली आहे . वीज नाही , अशी खोटी बतावणी करून करोडो रुपयांचा जनरेटर घेतलेला असताना शहरातील नागरीकांना वेळेवर पाणी द्यायचे नाही , तर ते करोडो रुपयांचे जनरेटर नगरपरिषदेने काय पुजा करायला घेतले आहेत का ? असा संतप्त सवाल ऍड. कैलास मोरे यांनी केला असून लवकरच पालिकेला जाब विचारण्यासाठी मोठे आंदोलन उभ करणार , असल्याचा इशारा त्यांनी कर्जत न. प. ला दिला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून कर्जत नगरपरिषदेच्या हद्दीत अनेक समस्या ” आ ” वासून उभ्या राहिल्या आहेत . यास जबाबदार असणाऱ्या पालिकेला कोणी काही बोलायला तयार नाही , त्यामुळे सर्वसामान्य नागरीक भरडला गेला आहे . दैनंदिन जीवनासाठी लागणारे पाणी मिळण्यासाठी नागरिकांना मोठी ” कसरत ” करावी लागत आहे . मिळणारे पाणी अनियमित व अशुद्ध असल्याने यावर उपाययोजना म्हणजे ” एक्स्प्रेस फिडर ” त्याबाबत कर्जत नगरपरिषदेने अदयापी ठोस भुमिका घेतली नाही . वीज महावितरणच्या आंदोलनावेळी हा प्रश्न चर्चेला आला परंतु त्यावर कर्जत नगरपरिषदेने पुढे काय केले ? याबाबत खुलासा केलेला नाही . करोडो रूपये खर्च करुन कर्जत नगरपरिषदेने पाणी पुरवठासाठी वंजारवाडी व दहिवली येथे जनरेटर घेतला आहे , परंतु त्याचा वापर होत नसुन ” वीज नाही ” या नावाखाली नागरिकांची ” पिळवणूक ” होत आहे.

वेळी – अवेळी पाणी पुरवठा होणे , अनेक भागामध्ये कमीजास्त दाबाने पाणी पुरवठा होणे , शुद्ध पाणी पुरवठा न होणे , शहरात डासांचे साम्राज्य , फवारणी न होणे , कचरा संकलन न होणे , सर्वत्र घाणीचे साम्राज्य , रहदारी रस्त्यातील विजेचे पोल न काढणे , मुख्य बाजारपेठेत वाहतुक कोंडी अशा विविध प्रश्नांसंदर्भात कर्जत न . प. चे मुख्याधिकारी ” वैभव गारवे ” यांच्याकडे नागरिकांनी अनेक वेळा दाद मागितली , परंतु ” प्रशासकीय अधिकार ” असलेल्या ” गेंड्याच्या कातडीच्या ” यंत्रणेने काहीच दाद दिली नाही.
यासंदर्भात अनेक निवेदने, छोटी – मोठी आंदोलने झाली आहेत , परंतु परिस्थीती ” जैसे थे ” असल्याने आता कर्जत शहरातील सर्व जनता कर्जत नगरपरिषदे विरुद्ध एकत्रित आली असून गणेशोत्सवा नंतर पालिकेला घेराव घालून जाब विचारण्यासाठी , वीज कंपनी विरोधात केल्याप्रमाणे पालिकेच्या विरोधात तीव्र व संतापजनक मोठ आंदोलन उभे करणार , असल्याचा इशारा ऍड. कैलास मोरे यांनी दिला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page