Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडवेणगाव येथे " नानासाहेब पेशवे " ( दुसरे ) यांची २०० वी...

वेणगाव येथे ” नानासाहेब पेशवे ” ( दुसरे ) यांची २०० वी जयंती होणार साजरी !

७ व ८ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )इंग्रजां सारख्या राक्षसी महत्त्वाकांक्षा असणाऱ्या क्रूर , चिवट व धूर्त , सत्तेशी झुंज देण्यासाठी आपले सर्वस्व झोकून देवून अखेर पर्यंत संघर्ष करण्याची तयारी असलेला निग्रही नेता म्हणून एकमेव उत्तर असलेले ” नानासाहेब पेशवे ” यांनी सर्व धार्मिक – सामाजिक – राजकीय – लष्करी शिपाई – भारतीय नागरिक यांच्या माध्यमातून ” इंग्रजांना ” या देशातून ” हद्दपार ” करण्यासाठी अस्मितेच्या निखा-यावरील विस्मृतीच्या राखेला देशमुक्त करण्याची फुंकर मारून आतील ज्वलंत अग्नी प्रज्वलित करण्याचे काम १८५७ च्या ” स्वातंत्र्य समराचे शिल्पकार – रणझुंजार नाना साहेब पेशवे ” यांनी केल्यानेच ते क्रांती पर्व घडले . हा लढा ३१ मे १८५७ रोजी संपूर्ण भारतभर सर्व समाजातील सर्व घटकां मधून लढला गेला . या विलक्षण योजनेला सर्व भारतभर ” तीर्थयात्रेच्या ” नावाखाली फिरून मूर्तरूप देणारे रण झुंझार नेतृत्व होते नानासाहेब पेशवे . रायगडच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे महादेव व गंगाबाई भट यांना ८ डिसेंबर १८२४ रोजी जन्म झालेले धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे ( दुसरे ) पुढे जाऊन दत्तक पुत्र होवून मरगळलेल्या भारतीयांच्या उरात चैतन्याची ऊर्जा निर्माण करणारे प्रेरणादायी नेतृत्व ठरले आहे , देशातून उठाव करण्याचे ठिणगीतून वणवा पेटला व त्यानंतर तात्या टोपे , झाशीची राणी , भाई कोतवाल , हिराजी पाटील असे थोर सेनानी उदयास आले , अशी माहिती मोहन शेटे यांनी देवून अशा ” रणझुंझार नानासाहेब पेशवे ” यांची २०० वी जयंती या भूमीत उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे आज मंगळवार दिनांक ०३ डिसेंबर २०२४ रोजी वेणगाव येथे भाई गायकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले .

या पत्रकार परिषदेत आयोजक नानासाहेब पेशवे स्मारक समिती उपाध्यक्ष भाई गायकर , सचिव रमेश दादा मुंडे , कोषाध्यक्ष नितीन कांदळगावकर , मोहन शेटे , गोपीनाथ बोराडे , रुपेश मोरे , अनंत हजारे , मयुरेश मुंडे , आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .

यावेळी सचिव रमेश दादा मुंडे यांनी ७ डिसेंबर २०२४ रोजी कर्जत मधील शाळेतील विद्यार्थ्यांची भव्य रॅलीचे नियोजन असेल , या पिढीला त्यांच्या शौर्या ची माहिती व्हावी यासाठी आजपर्यंतच्या २ हजार हुतात्म्यांचे सविस्तर माहितीचे फलक घेवून श्री महालक्ष्मी मंदिर वेणगाव येथून रॅली होणार आहे , कर्जत पोलीस ग्राऊंडवर राष्ट्रगीत महासंघ हे मर्दानी खेळ सादर करणार आहेत , व्याख्याने असणार आहेत , नानासाहेब पेशवे रथयात्रा कर्जत मधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून निघणार आहे , या रथायात्रेस २०० सुहासिनी औक्षण करणार आहेत . तर ८ डिसेंबर २०२४ रोजी ” स्वयंभू श्री महालक्ष्मी मंदिर ” देवस्थान समितीच्या भव्य प्रांगणात प्रमुख वक्ते अविनाश धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे , मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार संसदपटू श्रीरंग आप्पा बारणे , पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर , नानासाहेब पेशवे त्यांचे वंशज , मोहन शेटे त्याचप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
तरी १८५७ चे रण झुंझार नानासाहेब पेशवे यांच्या जन्मगावी वेणगाव येथे त्यांच्या २०० व्या जयंती निमित्त त्यांना ” मानवंदना ” देण्यासाठी या दोन्ही दिवशी होणाऱ्या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे , अशी विनंती आयोजक नानासाहेब पेशवे स्मारक समिती सचिव रमेश दादा मुंडे यांनी केली आहे .

भविष्यात राज्यस्तरीय व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना सांगून येथे नानासाहेब पेशवे यांचे भव्य स्मारक व संग्रहालय होण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती नानासाहेब पेशवे स्मारक समितीने केली आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page