

मावळ प्रतिनिधी : मावळ तालुक्यात होत असलेल्या वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेला आहे , याच्या निषेधार्थ आज मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगण , वडगाव मावळ याठिकाणी या निषेध मोर्चाला सुरुवात झाली.
मावळच्या औद्योगिक क्षेत्रात होणारा वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर जाण्यास शिंदे फडणवीस सरकारच कारणीभूत असल्याचा आरोप मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी केला आहे.केवळ राजकारणासाठी मावळातील तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप करू नका , असे शेळके यांनी यावेळी म्हटले.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय कंपनीने घेतल्यामुळे महाराष्ट्रा बरोबरच मावळ तालुक्याचे ही मोठे नुकसान झाले आहे . आंबळे येथे सेमी कंडक्टर्स उत्पादन करणारा हा मोठा प्रकल्प उभा राहणार होता . त्यामुळे महाराष्ट्रा बरोबरच मावळातील हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार होती . हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यामागे ‘ गुजरातधार्जिण्या शिंदे – फडणवीस सरकाचाच हात आहे , असा आरोप शेळके यांनी केला .
महाविकास आघाडी सरकारने तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रयत्न करून महाराष्ट्राच्या व मावळच्या विकासाला गती देणारा हा औद्योगिक प्रकल्प आणला होता . परंतु सत्ताधारी सरकारमधील नेत्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे , असे आमदार शेळके यांनी म्हटले आहे .
हा प्रकल्प मावळच्या भूमीत होणार असल्यामुळे त्याचा लाभ महाराष्ट्रासह मावळातील भूमिपुत्रांना , सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मिळणार होता . प्रत्यक्ष नोकरी बरोबरच अप्रत्यक्षपणे विविध उद्योग व्यवसायांना देखील चालना मिळणार होती.
त्यातून अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होऊन मावळच्या विकासाला देखील मोठी गती मिळाली असती . तथापि हा प्रकल्प मावळातून जाणे हे केवळ दुर्दैवीच नव्हे तर संतापजनक देखील आहे , अशी तीव्र प्रतिक्रिया शेळके यांनी व्यक्त केली.