वेहेरगाव डोंगरावरील हातभट्टीवर ग्रामीण पोलीस व ग्राम सुरक्षा दलाची कारवाई…

0
181

लोणावळा : वेहेरगाव येथील डोंगरावर सुरु असलेल्या हातभट्टीवर बुधवारी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत भट्टी उध्वस्त केली . तसेच हातभट्टीची तयार दारु व कच्चे रसायन नष्ट केले .सदर कारवाई लोणावळा ग्रामीण पोलीस व ग्राम सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गावठी हातभट्टीवर अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे, परंतु याचा मात्र हातभट्टीवाल्यांवर परिणाम होत नसून कारवाई नंतर पुन्हा ह्या हातभट्टया सुरु केल्या जातात . नुकतीच वेहेरगावच्या ओढ्यातील हातभट्टीवरील कारवाई नंतर आज पोलीस विभागाने वेहेरगाव डोंगरावरील हातभट्टी वर कारवाई करत ती उध्वस्त केली . ग्रामसुरक्षा दल , पोलीस मित्र व लोणावळा ग्रामीण पोलीस पथकच्या समन्वयातून गावठी हातभट्टी दारू विकणारे दोन इसम विवेकानंद किशोर राठोड व त्याचा साथीदार त्यांच्यावर छापा घालून त्यांच्याकडून 23 लिटर गावठी दारू व अंदाजे दोनशे लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले आहे . सदर इसमांना मुद्देमालासह अटक करून वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे .

लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या सह सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ , पोलीस हवालदार शकिल शेख , शरद जाधवर व ग्रामसुरक्षा दल व युवकांनी समन्वयाने ही कारवाई केली आहे.