वेहेरगाव येथे झालेल्या खुनातील दोन आरोपिंना पोलिसांनी चोवीस तासातच केले गजाआड..

0
812

लोणावळा : एकविरा देवीच्या चैत्री यात्रेसाठी आलेल्या भाविकाचा खून झाल्याची खळबळ जनक घटना दि.9 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली होती.त्याबाबत दिलेल्या फिर्यादी वरून 4 अनोळखी इसमांविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गु. र. नं.53/2022 भा द वी कलम 302,307,324,323,504,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

ऐन यात्रेत ही घटना घडल्याने या गुन्ह्यातील आरोपींना गजा आड करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर होते.सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रवीण धर्माजी पाटील ( रा. पेण, जि. रायगड ) व सह आरोपी अजय प्रवीण पाटील ( रा. पेण, जि. रायगड ) या दोघांना अवघ्या 24 तासातच अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

यात्रेदरम्यान घडलेला सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने लोणावळा ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने समन्वयाने गुन्ह्यातील आरोपींचा तत्काळ शोध घेण्यास सुरुवात केली.त्यावेळी गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी त्यांच्याकडील अधिकारी व पोलीस स्टाफ ची दोन पथके तयार करून आरोपींच्या शोध कार्यास रवाना केली.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी प्रवीण पाटील व सहआरोपी अजय प्रवीण पाटील या दोघांना अटक करण्यात आली असून यांच्या विरोधात पूर्वीचे यासारखे काही गुन्हे आहेत का याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

सदर गुन्हा हा यात्रेदरम्यान घडला असल्याने भाविकांची सुरक्षितता व तपासाच्या दृष्टीने अवघ्या 24 तासात आरोपींचा छडा लावल्याने खूप महत्वाची बाब ठरली आहे.

सदर घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकविरा देवीच्या पायथ्याशी विरुद्ध बाजूस घटनेतील जखमी व मयत हे खेळ पहात असताना कार्तिक म्हात्रे ( रा . कोपरीगांव, ठाणे ) याचा मोबाईल चोरीस गेला.त्यामुळे राहूल पाटील व त्याचे सहकारी सर्व रा . कोपरीगांव ठाणे यांनी त्या खेळ करणाऱ्या लोकांकडे आमचा मोबाईल फोन चोरीस गेला आहे . तो तुम्हीच किंवा तुमच्याच लोकांनी घेतला आहे.

असे विचारल्याच्या किरकोळ कारणावरून सदर लोकांनी संगनमताने तक्रारदार व त्याच्या सोबतचे सहकारी यांना शिवीगाळ करून बांबुने मारहाण करून व तिक्ष्ण हत्याराने खूपसून वार करून त्यांच्यातील हर्षल पाटील यास जखमी करुन , राहूल पाटील यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि मनोज कुंडलीक पाटील ( वय 49 वर्षे रा . कोपरीगांव ठाणे ) याच्या डाव्या छातीमध्ये कोणत्यातरी तिक्ष्ण हत्याराने खूपसून त्याचा खुन करुन पळून गेले अशी तक्रार सदर राहुल भास्कर पाटील (रा . कोपरीगांव ठाणे ) यांनी दिली होती सदर तक्रारीवरून खुन व खुनाचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख , अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे , लोणावळा उप विभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण बा . मोरे , सहा . पोलीस निरीक्षक सचिन राऊळ , पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर , सहा . फौजदार सिताराम बोकड , युवराज बनसोडे , कुतुबुद्दीन खान , पोलीस हवा . शकील शेख , पोहवा महेद्र सपकाळ , पोलीस नाईक शरद जाधवर , किशोर पवार , नितीन कदम , पोशि केतन तळपे , पोशि नागेश कमठणकर तसेच पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा फौजदार प्रकाश वाघमारे , पोलीस अंमलदार प्राण येवले यांनी समन्वयाने केली आहे.