शहरात शिवजयंती निमित्त सर्वत्र भगवे चित्र, परिसरातील अनेक शिवज्योतींचे लोणावळ्यात स्वागत….

0
139
लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज की जय … जय शिवाजी … जय भवानी … च्या घोषणा … पोवाड्यांचा आवाज … व तरुणांई उत्साह … अशा चैतन्यमय वातावरणात लोणावळा शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांवरून आणलेल्या शेकडो शिवज्योतींचे लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू समितीच्या वतीने तर जयचंद चौकात लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले . शिवसेनेच्या वतीने सर्व मंडळांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला.तर हिंदू समितीच्या वतीने भगव्या टोप्या व शिवज्योतीला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर यावर्षी शिवजयंती निमित्त लोणावळ्यात पुन्हा भगवा जल्लोषात फडकताना दिसला आहे. लोणावळा शहर व ग्रामीण पंचक्रोशीतील अनेक शिवज्योती लोणावळा शहरात छत्रपती शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आल्या होत्या .लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचे आयोजन केले होते. भगवान महावीर चौक गवळीवाडा ते नगरपरिषद इमारतीपर्यत रस्त्याच्या दुतर्फा भगवी कनात लावण्यात आली असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सायंकाळी चौकात शिवरायांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक तर मंगळवारी नृत्य स्पर्धा व बुधवारी शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे शहराध्यक्ष बाळासाहेब फाटक यांनी सांगितले. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक , लोकप्रतिनिधी , सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी छत्रपती शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.