श्रध्दा हॉटेल ते चारफाटा रस्त्याचे काम बंद !

0
205

प्रवास करताना होणाऱ्या त्रासामुळे ऐन गर्मीत नागरिकांत संताप…

भिसेगाव – कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील निवेदने – उपोषणे – टीका – टिपण्णी अश्या सर्व स्वरूपात वादग्रस्त ठरलेला श्रध्दा हॉटेल ते चारफाटा या रस्त्याचे काम एम एम आर डी ए च्या माध्यमातून सुमारे ५ करोड रुपयांचे सिमेंट काँक्रीटचे असलेले काम ८ जून २०२१ रोजी कर्जत नगर परिषदेने ठेकेदारास कार्यादेश देऊन एक वर्षाच्या आत रस्ता करण्याचे आदेश दिले असताना दिलेला कार्यादेश पूर्ण होत आला तरी अद्यापी अर्धवट अवस्थेत असलेल्या कामामुळे व आतापर्यंत धीम्या गतीने काम सुरू होते तर आता बंद असलेल्या कामाकडे समस्त भिसेगावकरांचे लक्ष लागले असून संताप व्यक्त करत असताना दिसत आहेत , म्हणूनच आलेल्या तक्रारींचा विचार करून भिसेगाव प्रभागाचे नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांच्याकडे तक्रार निवेदन देऊन ठेकेदाराने बंद ठेवलेले काम त्वरित चालू करून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.


उपरोक्त काम हे एम एम आर डी ए च्या अंतर्गत मंजूर झालेले आहे , सदरच्या कामाचा कार्यादेश दिल्यापासून संबंधित ठेकेदार आपल्या मर्जीनुसार काम करत आहे , नागरिकांना प्रवास करताना होणारा त्रास लक्षात न घेता काम करत असल्याने परिसरात संताप पसरला आहे , नागरिकांच्या रोषाला मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून सोमनाथ ठोंबरे यांना सामोरे जावे लागत आहे.

म्हणूनच नगरसेवक ठोंबरे प्रत्येक वेळी नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी ठेकेदारास लेखी व तोंडी कळवत होते , तरीही ठेकेदार या महत्वपूर्ण कामाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत , होत असलेले एक साईडचे काम देखील अर्धवट अवस्थेत आहे , सदरचा रस्ता हा प्रवास करणाऱ्या नागरीकांच्या वाहनांच्या दृष्टीने प्रमुख रस्ता असल्याने अश्या अर्धवट रस्त्याचा त्रास भिसेगाव , गुंडगे तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होत आहे , तर होणाऱ्या गैरसोईमुळे परिसरात अश्या कामाचा संताप पसरला आहे.

कर्जत स्थानकापासून जवळच असलेली गावे हालीवली – किरवली – परिसरातील महिला वर्ग , कामगार , जेष्ठ नागरिक , विद्यार्थी यांना रात्रीच्या वेळी कामे आटोपल्यावर घरी जाताना अंधारातून प्रवास करावा लागत आहे , अर्धवट कामामुळे ठेचकाळत तर वाहनांचे अपघात होत आहेत.वरील कामामध्ये स्लॅब ड्रेन हे काम चालू केले नसून ते काम लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे आहे , ते काम करताना क्यूरिंग साठी वेळ लागणार असल्याने ते काम पावसाळ्या अगोदर करणे गरजेचे आहे.

या परिसरात पावसाचे पाणी जादा प्रमाणात जमा होत असल्याने येथे मागील पुराच्या वेळी दिसून आलेले आहे , सदरचे काम पावसाळ्याआधी होणे शक्य नसल्यामुळे त्या कामाची क्यूरिंग महत्वाची असून ते व्यवस्थितपणे पूर्ण करता येणार नाही , त्यामुळे कामाचा दर्जा खालावणार असून , ठेकेदाराला याबाबतीत लवकरात लवकर आदेश देऊन काम पूर्ण होणे गरजेचे आहे.


सदरचे काम पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात या परिसरात पाणी साचून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन भिसेगाव – गुंडगे तसेच या परिसरातील शेजारील अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याचे नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी तक्रार अर्जात म्हटले असून कार्यादेशाचा कालावधी जवळ येत असताना काम का बंद ठेवले आहे , तर यापूर्वीचे काम देखील धीम्या गतीने झाल्याने नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रासास सामोरे जावे लागले , येणाऱ्या पावसाळ्यात अजून त्रास होण्याचे चित्र दिसत असल्याने ठेकेदारच्या या बेजबाबदार कामाचे व त्यावर अंकुश नसलेल्या पालिकेच्या कारभाराचा नागरिकांत ऐन गर्मीत संताप खदखदत आहे.