कार्ला (प्रतिनिधी): श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूकीच्या अनुषंगाने रॅपिड ऍकशन फोर्स सह लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन अधिकारी व स्टाफ यांचा वेहेरगाव येथे रूट मार्च घेण्यात आला.
महाराष्ट्राचे जागृत देवस्थान व ठाकरे कुटुंबाची,आगरी बांधव आणि सर्वांची श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव कार्ला येथील श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट ची निवडणूक दि.26 रोजी होत आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन कडून रूट मार्च घेण्यात आला.
स्वर्गीय अनंत तरे यांनी अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून एकवीरा देवीची सेवा केली. सात ते आठ वर्षापासून विश्वस्त यांच्यातील वाद हा पराकोटीला गेल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा 2015 पासून प्रशासकीय कारभार येथे सुरू होता, यात काही काळ वडगाव कोर्ट, तहसीलदार हे हा कारभार पाहत होते.मात्र आता 26 फेब्रुवारीला ही 7 विश्वस्त यांची निवडणूक होत आहे.यात 3 सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याने 4 विश्वस्तांसाठी एकूण 27 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.या महत्वपूर्ण आणि नामांकित देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली रॅपिड ऍकशन फोर्स व लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन कडून रूट मार्च घेण्यात आला.