Tuesday, May 30, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडश्रेयवादाच्या लढाईत भिसेगाव - कर्जत रेल्वे भुयारी मार्ग !

श्रेयवादाच्या लढाईत भिसेगाव – कर्जत रेल्वे भुयारी मार्ग !

काम त्वरित सुरू करण्याची भिसेगाव ग्रामस्थांची मागणी…

भिसेगाव -कर्जत ( सुभाष सोनावणे ) श्रेय वादाच्या क्षुल्लक कारणावरून सध्या भिसेगाव ते कर्जत शहर यांना जोडणारा रेल्वे भुयारी मार्गाचे काम निधी मंजूर होऊनही प्रत्येक्षात काम सुरू होत नसल्याने लाल फितीत अडकून आहे . मात्र याचा त्रास भिसेगाव ग्रामस्थांना सहन करावा लागत असल्याने नागरिकांत संतापाचा भडका उडत आहे . त्यामुळे भिसेगाव ग्रामस्थांच्या संयमाचा अंत न बघता या भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करून या भुयारी मार्गास श्री अंबे भवानी माता भुयारी मार्ग असे देण्याचा भिसेगाव ग्रामस्थांच्या वतीने ठराव पास करून तशी मागणी करण्यात आली आहे.

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्जत भिसेगाव यांना जोडणारा रेल्वे भुयारी मार्ग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला अतिशय महत्त्वाचा विषय आहे . रेल्वे प्रशासनाने हा पूर्वापार चालू असलेला रेल्वे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भिसेगाव ग्रामस्थांनी या निर्णया विरोधात आंदोलन छेडले होते , त्यावेळी संघर्ष झाला या संघर्षात अनेक नागरिक , महिला जखमी झाले , त्यांच्यावर केसेस देखील दाखल झाल्या , याच ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग व्हावा , अशी मागणी अनेक वर्षांपासून भिसेगाव ग्रामस्थांच्या वतीने केली जात होती.
हा भुयारी मार्ग कर्जतच्या पूर्व – पश्चिम भागाला जोडणारी नाळ आहे . आज कर्जतमध्ये जायचे असेल तर दोन किलोमीटरचा फेरा मारून जावे लागते. याचा सर्वार्थाने त्रास विद्यार्थी , महिलावर्ग , वयोवृद्ध नागरिक , आजारी रुग्ण , गर्भवती महिला यांना अनेक वर्षापासून सहन करावा लागत आहे.अत्यवस्थ आजारी रुग्ण दवाखान्यात नेण्यासाठी विलंब होतो , त्यामुळे रुग्णाच्या जीवावर बेतल्याच्या घटना हि घडल्या आहेत . त्यामुळे या भुयारी मार्गाकडे गांभीर्याने विचार करणे , गरजेचे आहे.काही महिन्यापूर्वी या मार्गाच्या कामासाठी लागणारा निधी मंजूर झाला होता , तशा प्रकारची बॅनरबाजी ही करण्यात आली होती , परंतु प्रत्यक्षात मात्र अद्यापी काम सुरूच झाले नाही.
या रेल्वे भुयारी मार्गास नाव कोणाचे द्यावे ? अशा प्रकारच्या भूमिकेमुळे या कामास सुरुवात झालीच नाही . श्रेय वादाच्या या धोरणामुळे नागरिकांच्या जीवनाशी संबंधित असलेला हा प्रश्न सोडविण्यास होणारा उशीरही अतिशय दुर्दैवी बाब आहे . यामध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत असून भिसेगाव परिसरात सध्या लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे . कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव हे नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण असूनही जाणून – बुजून या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे , अशी जनसामान्य नागरिकांची भावना झाली असून या भूमिकेमुळे नागरिकांच्या मनात संताप खदखदत आहे.
त्यामुळे रेल्वे भुयारी मार्ग लवकरात लवकर न झाल्यास या संतापाचा उद्रेक होऊ शकतो . याविरोधात भिसेगाव ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या तयारीत असून पुढील येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार असून सदरच्या भिसेगाव – कर्जत रेल्वे भुयारी मार्गास ” श्री अंबे भवानी माता भुयारी मार्ग ” असे नाव देण्याचा ठराव होऊन तशी मागणी देखील करण्यात आली आहे . सदरचे निवेदन हे मा . मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे , मा. आमदार महेंद्रशेठ सदाशिव थोरवे , व कर्जत न.प. च्या नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांना देण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page