संगीत क्षेत्रातील ” कोहिनुर हिरा ” डॉ. संतोष बोराडे ” संगीतरत्न ” या पुरस्काराने सन्मानित !

0
170

जीवन – अध्यात्म आणि संगीत यांचा संगम घडविणारे अविस्मरणीय कार्य..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे)जीवन – अध्यात्म आणि संगीत यांचा त्रिवेणी संगम घडवुन अविस्मरणीय कार्य करणारे खालापूर तालुक्यातील कलोते येथे राहणारे डॉ. संतोष बोराडे, यांचा पुणे येथे राष्ट्रभक्ती राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ” संगीतरत्न ” या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांचेमार्फत या कार्यक्रमाचे पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक रामचंद्र ढेकणे, न्यायमूर्ती मदन गोसावी , डॉ. बबन जोगदंड, न्यायमूर्ती सु.बु. बुक्के, मा. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांसारखे मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. संतोष बोराडे – रायगड यांना विज्ञाननिष्ठ व समाजाभिमुख प्रामाणिक संगीत सेवेसाठी अविस्मरणीय कार्य करणारे म्हणून ” संगीतरत्न २०२२ ” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तब्बल ३५०० हुन अधिक कार्यक्रमांतून देश-विदेशात भारतीय संस्कृतीची आणि संगीताची वैज्ञानिक विचारधारा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत आहेत.
डॉ. संतोष बोराडे यांनी गेली 21 वर्षे अविरतपणे संगीत सेवा केली आहे. ” जीवनसंगीत ” कार्यक्रम विविध शहरांतुन सर्वसामान्य जनतेपर्यंत ते पोहोचवीत आहेत.या कार्यासाठी त्यांना या आधीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे . यापूर्वीही त्यांना नॅशनल नोबिलिटी पुरस्कार २०१९ , पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते देण्यात आल.
इनोव्हेटिव्ह इंडियन यंगस्टर पुरस्कार २०२०, दुबई मल्टी कम्युनिटी सेंटर, दुबई ग्लोबल एक्सलन्स पुरस्कार २०२१- हैदराबाद , प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार, २०२१, हरियाणा राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार २०२१, महाराष्ट्र , यशवंतराव चव्हाण प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, पुणे, प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन केंद्र, रामेती, पुणे महाराष्ट्र पोलीस, सर्व शासकीय-निमशासकीय विभाग, माधवबाग आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र – खोपोली,तसेच विविध वैद्यकीय शाखांमधून काम करणारे हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजस, उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था, कारखाने व कार्यालयांबरोबर संलग्नपणे काम करून डॉ. संतोष बोराडे यांनी जीवन आणि संगीताचा एकत्रपणे अभ्यास करणारा एक नवा समाजवर्ग घडविला आहे.

संगीत व अध्यात्म या विषयांचे शिक्षण विविध क्षेत्रातील तज्ञ गुरूंकडून घेत असून, पंडीत शंकरराव वैरागकर, जयपूर पतियाळा घराणा यांचे कडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण ,संगीतकार यशवंत देव – मुंबई , संगीतकार गोपाळ ढवळीकर – गोवा, गझलगायक प्रकाश शहा, हार्मोनिअम वादक संतोष घंटे, नसीम खान, मास्टर तुलसीदास पवार, भजन गायक भगवान महाराज आपटेकर आदी तज्ञांच्या मार्गदर्शनातून विविध सांप्रदायिक भजन परंपरा व शास्त्रीय संगीत घराण्यांचा सखोल व तुलनात्मक अभ्यास केला.गेली एकवीस वर्षे अथक परिश्रम करत जवळपास साडे तीन हजाराहुन अधिक कार्यक्रमांतून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील श्रोत्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
अडीच लाखाहून अधिक विध्यार्थी, पंधरा हजाराहून अधिक व्यावसायिक आणि आयएएस व आयपीएस अधिकारी, वीस हजाराहून अधिक मनोकायिक व्याधींनी ग्रस्त रूग्ण, शेकडो ज्येष्ठ नागरिक संघ, महिला तसेच समाजाच्या वेगवेगळया स्तरांपर्यंत त्यांनी आपला विषय पोहोचवला आहे . महाराष्ट्रातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींपासून ते युरोप, अमेरिका, जपान, दुबई सारख्या देशांतील उच्चपदस्थ व्यावसायिक अधिकाऱ्यांपर्यंत त्यांनी भारतीय संगीताची ही अनमोल ठेव प्रभावीपणे पोहोचवली आहे .