Tuesday, November 29, 2022
Homeपुणेमुळशीसिंहगडावर सहलीसाठी आलेल्या 12 वीच्या विध्यार्थ्याचा हत्ती टाक्यात बुडाल्याने मृत्यू...

सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या 12 वीच्या विध्यार्थ्याचा हत्ती टाक्यात बुडाल्याने मृत्यू…

मुळशी(प्रतिनिधी) : सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा गडावरील हत्ती टाक्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रविवार दि .18 रोजी दुपारच्या सुमारास घडली .

शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरून थेट हत्तीटाक्याच्या पाण्यामध्ये पडल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला . सदर विद्यार्थी हा मुळशी तालुक्यातील असून या दुर्दैवी घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे . शाहिद मुल्ला ( ता . मुळशी ) असे या विद्यार्थ्याचे नाव असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे .

हवेली पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार , मुळशी तालुक्यातील प्रियदर्शनी स्कूलचे इयत्ता बारावीचे 60 विद्यार्थी व 4 शिक्षक सिंहगडावर सहलीसाठी आले होते . गड पाहत असताना सर्व विद्यार्थी गडावरील देवटाके व त्याला लागूनच असलेल्या हत्ती टाके परिसरात आले . यावेळी मृत शाहिद मुल्ला या विद्यार्थ्याचा शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरला व तो थेट हत्तीटाक्याच्या पाण्यामध्ये पडला .याप्रसंगी तेथे उपस्थित अमोल पढेर , विठ्ठल पढेर , आकाश बांदल , विकास जोरकर , ओंकार पढेर , सूरज शिवतारे , पवन जोरकर , सुग्रीव डिंबळे , तुषार डिंबळे , शिवाजी चव्हाण , रामदास बांदल , राजू सोनार व इतर हॉटेल व्यावसायिकांनी प्रसंगावधान दाखवत शाहिदचा शोध घेण्यासाठी ताबडतोब पाण्यामध्ये उड्या घेतल्या . काही वेळ तो मिळून येत नव्हता . मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्थानिकांनी शाहिद मुल्ला यास पाण्यातून बाहेर काढले .

यावेळी जोरदार पाऊस सुरू होता त्यामुळे देवटाके पूर्ण भरलेले असल्याने शाहिदचा शोध लागण्यास उशीर झाल्यामुळे या दुर्दैवी प्रसंगात या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.

विद्यार्थ्यांसोबत आलेले शिक्षक व विद्यार्थी आकस्मिकपणे घडलेल्या या प्रकारामुळे घाबरून गेले होते . दरम्यान , पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला याबाबत माहिती देण्यात आली होती . परंतु अग्निशमन दल घटनास्थळी येण्याच्या अगोदर स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढला . मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीस ठाण्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page