Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअखेर अनेक प्रयत्नानंतर भिसेगाव डी.पी.रस्त्याचे कामाला सुरुवात !

अखेर अनेक प्रयत्नानंतर भिसेगाव डी.पी.रस्त्याचे कामाला सुरुवात !

भिसेगाव रस्त्याच्या कामासाठी पाच वर्षांत तब्बल पाच वेळा मुदतवाढ…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” सरकारी काम आणि सहा महिने थांब ” , असा शाळजोडा पूर्वीपासून प्रसिद्ध आहे , मात्र २१ वे शतक लागूनही शासकीय कामात बदल झालेला दिसून येत नाही .आपल्या मर्जीनुसार काम करणाऱ्या ठेकेदारांवर अंकुश नसल्याने नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो , याचे दृश्य आपणास भिसेगाव प्रभागात पहाण्यास मिळेल .नागरिकांच्या जागरूकतेमुळे व वृत्तपत्रातील ” शाब्दिक फटका-याने ” सूत्र हालल्याने ठेकेदाराला कारवाई करू , असा सज्जड दम दिल्यानेच भिसेगाव डीपी रस्त्याचे काम अखेर सुरू झाले . विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या या रस्त्याला ठेकेदाराची मर्जी राखत पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

कर्जत न.प. हद्दीत भिसेगाव प्रभागातील एस.टी. स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऍड.अभिन शिंदे यांच्या घराच्या समोरील असणाऱ्या व रस्त्त्या पलीकडे अरिहंत अलोकी या इमारतीकडे जाणाऱ्या डी.पी. रस्त्याचे कार्यादेश जुलै २०१८ साली पारित झालेले होते . मात्र सन २०२३ आले तरी या कामाला सुरुवात झाली नव्हती . विशेष म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती , तर आता शिवसेना – भाजप – आरपीआय पक्षाची सत्ता २०१९ साली येऊन त्यांची पाच वर्षांची मुदत देखील आठ महिन्यात संपायला आली तरी या रस्त्याला अजून ” मुहूर्त ” सापडला नव्हता.
तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे व त्यानंतर आलेले पंकज पाटील यांनी या मे. लोणावळा कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला सलग पाच वेळा मुदत वाढ देऊन ३० डिसेंबर २०२१ पर्यंत शेवटची मुदतवाढ असताना देखील काम सुरू न झाल्याने येथील रहिवासी व ” कर्जत वार्ता ” चे पत्रकारांच्या बातमीच्या दणक्याने अखेर आताचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी ठेकेदाराला बोलावून कारवाईचे पत्र दिल्यावर अखेर ठेकेदाराने काम सुरू केले आहे.

सदरचा रस्ता डी.पी. सिमेंट काँक्रीटचा असल्याने तो १२ मीटरचा असून गटारे व फुटपाथ आहे . या कामास ठेकेदाराने पाच वर्षांचा विलंब लावला असल्याने या कामाचे दर हे पाच वर्षांपूर्वी चे आहेत म्हणूनच पालिका प्रशासनाने ठेकेदार काम निकृष्ट दर्जाचे करतो की कसे ? याकडे बारकाईने लक्ष द्यावे , निकृष्ट दर्जाचे काम केल्यास याविरोधात तीव्र आक्षेप घेवून काम बंद पाडले जाईल , असा इशारा कर्जत नगर परिषदेला या बातमीच्या माध्यमातून येथील नागरिकांनी दिला आहे . हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण झाल्यास पावसाळ्यात या परिसरात येणाऱ्या पुरामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page