Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रइंदोर अंमळनेर बस पुलावरून कोसळली या अपघातात 13 जणांचा मृत्यू !

इंदोर अंमळनेर बस पुलावरून कोसळली या अपघातात 13 जणांचा मृत्यू !

मुंबई, दि.18 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर-अमळनेर बस दुचाकी स्वाराला वाचवताना पुलावरून थेट नदी पात्रात कोसळली या अपघातात 13 मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये 8 पुरूष, 4 स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे.

जळगाव जिल्हाधिकारी व जळगाव जिल्हा प्रशासन यांचे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे.

एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : 1) चेतनचे वडील राम गोपाल जांगिड़ ( राहणार नांगल कला, गोविंदगढ, जयपूर, राजस्थान ) 2) जगन्नाथ यांचे वडील हेमराज जोशी ( वय 70 वर्ष, निवासी मल्हारगढ़, उदयपूर राजस्थान ) 3) प्रकाश यांचे वडील श्रवण चौधरी ( वय 40 वर्षे, राहणार शारदा कॉलनी, अमळनेर, जळगाव, महाराष्ट्र ) 4) निबाजी यांचे वडील आनंदा पाटील ( वय 60 वर्ष, राहणार पीलोदा, अमळनेर ) 5) कमला बाई यांचे पती नीबाजी पाटील ( वय 55 वर्षे, राहणार सी. पिलोदा अमळनेर, जळगाव ) 6 ) चंद्रकांत यांचे वडील एकनाथ पाटील ( वय 45 वर्षे, राहणार अमळनेर, जळगाव ), (उपरोक्त 1 ते 6 पर्यंतच्या मृतकांची ओळख आधारकार्डद्वारे केलेली आहे, 7) श्रीमती अरवा यांचे पती मुर्तजा बोरा ( वय 27 वर्षे, राहणार मूर्तिजापूर, अकोला ) यांची नातेवाईकांद्वारे ओळख पटलेली असून 8 ) सैफुद्दीन यांचे वडील अब्बास ( निवासी नूरानी नगर, इंदौर ) यांची नातेवाईकांद्वारे ओळख पटलेली आहे. तसेच मृतांमध्ये बसच्या चालक व वाहकाचाही समावेश आहे.

याशिवाय अद्याप पाच मृतदेहांची ओळख पटलेली नाही. अपघातग्रस्त बस नदीतून बाहेर काढण्यात आली असून, अपघातात अद्याप किती लोक असतील याची माहिती मिळालेली नाही. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळाकडून दहा लाख रूपये मदत देण्यात येणार असून रूग्णालयात उपचारासाठी दाखल जखमींवर उपचारही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहेत.अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक( एम एच 40 एन 9848 ) ही आज दि. 18 जुलै रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथून अमळनेरकडे मार्गस्थ झाली. सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेशमधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीच्या पूलावर सदर बस अपघातग्रस्त होऊन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असून बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page