Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्याला पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न व्हावा ,सागर शेळके यांची मागणी..

कर्जत तालुक्याला पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न व्हावा ,सागर शेळके यांची मागणी..

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्याला निसर्गाचे वरदान आहे.गर्द झाडी , डोंगरातून फेसाळत येणारे धबधबे , ही या तालुक्याची पावसाळी ओळख , मात्र या निसर्ग वरदानाचे पर्यटन स्थळात रूपांतर केल्यास बेरोजगारावर रामबाण औषध सापडेल , परंतु प्रशासन येथील रोजगारावर गदा आणण्याचे काम दरवर्षी पावसाळ्यात करत असल्याने याच पर्यटकांच्या आगमनाने स्थानिकांचा उदारनिर्वाह चालत असल्याने पावसाळी सहलींवर बंदी घालण्या ऐवजी कर्जत तालुक्याला पर्यटनाचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका युवक अध्यक्ष सागर शेळके यांनी केली आहे.

कर्जत तालुक्यात औद्योगिकरण एमआयडीसी नसल्याने अनेक वर्षांपासून तरुणांना रोजगाराची खुप मोठी समस्या आहे . हरितपट्टा घोषित केलेल्या कर्जत तालुक्याला निसर्ग सौंदर्य लाभलेले आहे.त्या सौंदर्यामध्ये माथेरान थंड हवेचे ठिकाण असल्याने व डोंगर भाग असल्याने पावसाळ्यात उसळणाऱ्या धबधब्यांमुळे आकर्षित होणाऱ्या पर्यटकांमुळे येथील स्थानिकांना रोजगार मिळत असतो,मात्र प्रशासन प्रतिबंधात्मक १४४ कायदा लागु करून रोजगारावर गदा आणत आहे.१४४ कलम लागू करण्याचे हे ४ थे वर्ष आहे.

मागील वर्ष व चालू वर्ष कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाचा योग्य निर्णय होता , पण त्या अगोदरचे २ वर्ष देखील नियम लावण्यात आला होता . पावसाळ्यात पर्यटक ट्रेकिंग व फिरायला मोठ्या प्रमाणात कर्जतमधे येतात, तालुक्यात आशाणे धबधबा, बेकरे, वदप,नेरळ जुमापट्टी, सोलनपाड़ा,कोंढाणा लेणी,माथेरान असे अनेक धबधबे व लेणी , पर्यटन स्थळे आहेत.

या पर्यटन स्थळावर अनेक छोटे मोठे दुकानदार,होटेल व्यावसायिक , ग्रामीण भागात घरगुती जेवण देणारे लोक , खानावळ, वडापाव – भजी विक्रेते , हातगाड़ीवर भाजलेला कणीस विकणारे,चहा – कॉफ़ी विकणारे ,सैंडविच ,फरसाणवाले,पानटपरी असे अनेक छोटे मोठे व्यावसायिक या पर्यटकांवर अवलंबून आहेत.रिक्षा वाले,माथेरानचे टैक्सी वाले, घोड़ेवाले,होटेल व्यावसायिकांना दूध,भाजी,किराना पोहचवणारे, ट्रांसपोर्टवाले असंख्य व्यावसायिक एकमेकावर अवलंबून आहेत.

त्यात लॉकडाउन,कोरोनामुळे अनेक लोकांचा व्यवसाय बंद पडायच्या मार्गावर आलाय,नोकर वर्गाचा पगार देता येत नाही,बँकेचे लोनचे हप्ते,रिक्षा ,टैक्सी,टेम्पो,याचे बँकेचे थकित राहिलेले हप्ते,कुटुंब,घर चालवायचे कसे हा यक्षप्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे म्हणूनच प्रशासनाने यावर्षी कोरोनामुळे १४४ कलम लावणे योग्य आहे,पण निदान पुढच्या वर्षीपासून आपण कर्जत तालुक्यातील तरुण , गोरगरीब नागरिकांच्या रोजंदारीचा विचार करून जमावबंदी लावणे कितपत योग्य आहे ? याचा प्रशासनाने विचार करावा , यावर सागर शेळके यांनी प्रकाश टाकला.

तालुक्यातील सारे घटक पर्यटनावर अवलंबून असतील तर गोव्याच्या ” दूधसागर वॉटर फॉल ” ज्या धर्तीवर पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पर्यटन वाढीसाठी स्थानिक ग्रामपंचायत , व इतर प्रशासनास सोबत घेऊन येणाऱ्या पर्यटकांकडून योग्य कर घेऊन,त्यातून त्यांच्या सुरक्षितेसाठी लाइफ गार्ड नेमावेत,कचरा व्यवस्थापन करावे,चेंजिंग रूम,टॉयलेट या सुविधा उपलब्ध करुण द्याव्यात,यातून स्थानिक युवकांना रोजगार निर्माण होईल,पर्यटकांना नियम व अटी लागु करावेत, यामूळे कर्जत तालुक्यातील पर्यटनात वाढ होईल,व स्थानिक गरजू लोकांना निदान पोटा पुरता का होईना रोजगार निर्माण होईल.

तर माथेरान हे पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे आणि माथेरानमध्ये व पावसाळी सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांवर तालुक्यातील कर्जत चारफाटा , डिकसल,नेरल , कर्जतच्या परिसर मधील सर्व व्यावसायिक अवलंबून आहेत,तरी माथेरान नागरिकांचा योग्य विचार करून माथेरान पर्यटकांना खुले करावे , व कर्जत तालुक्यातील तरुणांच्या व स्थानिकांच्या रोजगारवाढीसाठी कर्जत तालुक्याला प्रशासनाने ” पर्यटन स्थळाचा ” दर्जा द्यावा , अशी रास्त मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका युवक अध्यक्ष सागर शेळके यांनी केली.

- Advertisment -

You cannot copy content of this page