Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एक्शन मोड मध्ये !

कर्जत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एक्शन मोड मध्ये !

उपजिल्हा रुग्णालयात बंद असलेल्या सेवा सुरू करा ,अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईशारा..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातून गेल्यावर गेली चार वर्षे पालिकेच्या विरोधात व कर्जत शहरात नागरिकांच्या जाणवणा-या छोट्या – मोठ्या समस्यांचा आवाज न उठविणारे पदाधिकारी आता ” एक्शन मोड ” मध्ये आले असून , आज कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांना उद्भवणा-या समस्यांबद्दल आवाज उठवीत निवेदन सादर केले . आमच्या मागण्या त्वरित मान्य न केल्यास व सोई सुविधा नागरिकांना न दिल्यास याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा संतप्त ईशारा देखील देण्यात आला आहे.तालुक्यातील आरोग्य सेवा सुरळीत नसल्याने नागरिकांना खाजगी सेवा हि खर्चिक वाटत आहे.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अनेक सेवा बंद आहेत . सध्या हृदय विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात , मात्र साधे छातीत दुखल्यावर तपासणी करण्यास उपजिल्हा रुग्णालयात गेल्यावर ईसीजी तपासण्याची कुठलीच सेवा नसल्याने रुग्ण अजून घाबरतात , त्यावर त्वरित प्रथमोपचार नसल्याने नागरिकांत उपजिल्हा रुग्णालया बाबतीत संताप खदखदतो , तर साधी सोनोग्राफी मशीन देखील नादुरुस्त असल्याने तातडीने कमी पैशात हि सेवा उपलब्ध नसते , त्यातच डायलिसिस रुग्णांना देखील सेवा बंद असल्याने खाजगी रुग्णालयात मुंबईला जावे लागते.
दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली ब्लड बँक देखील बंद असल्याने रक्ताची गरज असणारे रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल होऊन रक्त चढवतात , व नाहक हजारो रुपयांचा त्यांना भुर्दंड पडतो . या प्रमुख समस्या असताना या सेवा जाणून बुजून तर बंद केल्या नाहीत ना , असा संशय बळावत असून यावर ठोस उपायांची गरज येऊन ठेपली आहे.म्हणूनच आज कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी – ईसीजी व डायलिसिस सेंटर , ब्लड बँक , तातडीने चालू करण्यात यावे व येथील आदिवासी बहुल भागातील आदिवासी वर्गाला तसेच ग्रामीण भागातील गोर गरीब नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यात यावे , यासाठी कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षक माधवी जाधव मॅडम यांना निवेदन देण्यात आले असून या सेवा त्वरित सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.
यावेळी कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजेशदादा लाड , कर्जत शहराध्यक्ष रणजीत शेठ जैन , महेंद्रशेठ चंदन – पाटील , युवक अध्यक्ष सोमनाथ पालकर , युवा नेते कृष्णा जाधव , बबलु वांजळे , अमीर मणियार , आदी पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page