Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकागदी घोडे नाचवत चिल्हार नदी पात्रात केलेल्या बांधकामावर कारवाई करण्यास पाटबंधारे खात्याची...

कागदी घोडे नाचवत चिल्हार नदी पात्रात केलेल्या बांधकामावर कारवाई करण्यास पाटबंधारे खात्याची टाळाटाळ..

कारवाई न झाल्यास रजपे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य करणार आमरण उपोषण..

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील रजपे ग्रामपंचायत हद्दीतील टेंभरे येथील चिल्हार नदीच्या पात्रात पूररेषेच्या आत बेकायदेशीर बांधकाम कुठलीही पूर्वपरवानगी न घेता मे.प्रोईड्स फिडल्स या नावाने दत्ता पिंपरकर व बांधकाम ठेकेदार किशोर ठाकरे यांनी केले असून , संबंधित बेकायदेशीर बांधकाम तोडून टाकण्यासाठी रजपे ग्रामपंचायत यांनी मा.जिल्हाधिकारी , प्रांत अधिकारी – कर्जत , तहसीलदार कर्जत , पाटबंधारे विभाग -कर्जत यांना पत्रव्यवहार करूनही कागदी घोडे नाचवत सदरचे काम आमच्या अधिकारात येत नसल्याचे सांगत बेकायदेशीर बांधकाम तोडून टाकण्याची कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने नागरिकांच्या व आदिवासी बांधवांच्या सुरक्षिततेसाठी दि.२९ जून २०२१ पासून आमरण उपोषण करणार असल्याचे रजपे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. दिपाली प्रमोद पिंगळे यांनी आज पत्रकार परिषदेत प्रशासनाला ईशारा दिला आहे.

त्या आज दि.२१ जून २०२१ रोजी राष्ट्रवादी भवन दहिवली – कर्जत येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.रजपे ग्रामपंचायत हद्दीत टेंभरे गावाच्या लगत असलेल्या कातकरी वाडीच्या शेजारी चिल्हार नदीच्या पात्रात पुररेषा हद्दीत दोन महिन्यांपासून दगड सिमेंटचे भिंत बांधण्याचे तसेच अनधिकृत उत्खनन व विहिरीसाठी ब्लास्टिंग काम कुणाचीही शासकीय परवानगी न घेता संपूर्ण नदी क्षेत्रात करण्यात येत आहे.

याबाबतीत रजपे ग्रामपंचायतीने यावर हरकत घेऊनही संबंधित दत्ता पिंपरकर व ठेकेदार किशोर ठाकरे कुणालाही न जुमानता अनधिकृत रित्या काम करत आहेत.दरवर्षी या भागात पावसाच्या पाण्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती असताना आता या बांधण्यात आलेल्या दगडी भिंतीमुळे पाण्याचा प्रवाह उलटून येथील शेतक-यांच्या शेतीचे नुकसान होणार आहे,तर शेजारीच राहणाऱ्या कातकरीवाडीतील आदिवासी बांधवांच्या घरात पाणी शिरून जीवावर बेतण्याची शक्यता असताना संबंधित अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.

दोन महिने रजपे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.दिपाली पिंगळे व सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक यांनी तक्रारी केल्यानंतर सुस्त असलेली यंत्रणा दि.४ जून २०२१ रोजी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यास जाऊन पंचनामा केला .यावेळी कर्जत तहसीलदार , उप अभियंता पाटबंधारे विभाग कर्जत , कर्जत पोलीस निरीक्षक , मंडळ अधिकारी कशेळे , व इतर महसूल अधिकारी तसेच गावकरी उपस्थित असताना सदरील काम हे नदीच्या पात्रात असून पुररेषेच्या आत असल्याने भविष्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊन जीवित व इतर हानी होऊ शकते त्यामुळे सदरचे बांधकाम काढून टाकणे आवश्यक आहे.

असे लेखी पत्रात पाटबंधारे विभाग कर्जत यांनी म्हटले आहे, परंतु ते अधिकार महसूल विभाग तहसील कार्यालय व ग्रामपंचायत यांना असल्याचे कोलाड येथील कार्यकारी अभियंता धाकतोडे व कर्जत पाटबंधारे उप अभियंता गुंटरकर हे म्हणत टोलवाटोलवी करत आहेत,तर कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख हे हा प्रश्न पाटबंधारे विभागाचा असल्याचे म्हणत त्यांच्यावर ढकलत असल्याने पावसाळ्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन जीवितहानी झाल्यास हेच अधिकारी जबाबदार असणार का ? असा प्रश्न आदिवासी बांधव करत आहेत.

त्यामुळे वरील अधिकारी सध्यातरी ” शेतातील बुझगावणे ” च्या भूमिकेत दिसून येत असल्याने दि .२९ जून २०२१ रोजी रजपे ग्रामपंचायत सरपंच सौ.दिपाली प्रमोद पिंगळे , उपसरपंच संतोष निलधे , गजानन शिद , संगीता घुडे , दर्शना निलधे , काळूबाई बांगारी , भाग्यश्री घरत , मनिषा फाळे , आदी सदस्य तसेच हरेश घुडे , प्रमोद पिंगळे , ताई शिद पूरग्रस्त आदिवासी महिलावर्ग आमरण उपोषण करणार आहेत.

मात्र सद्यस्थितीत या कामात उच्च राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा कानावर येत आहे.परंतु अशा बेजबाबदार अधिका-यांमुळे आदिवासी कुटुंबांना नाहक जीवावर बेतण्याची घटना घडल्यावरच संबंधित अधिकारी वर्ग जागा होणार का ? असा यक्षप्रश्न रजपे ग्रामस्थ करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page