Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकोकण कृषी विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत समन्वयाची गरज-डॉ. अजय कोहली..

कोकण कृषी विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत समन्वयाची गरज-डॉ. अजय कोहली..

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे )सर्वसामान्य व्यक्तिंच्या आहारात मुख्य अन्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या भाताच्या सुधारासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलिपाईन्स यांच्यात समन्वयाची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक संशोधन संचालक व आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलिपाईन्सचे उपमहासंचालक डॉ. अजय कोहली यांनी येथे केले. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात ‘ ५६ वी महाराष्ट्र राज्य वार्षिक भात गटचर्चा ‘ आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत हे होते. व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे संशोधन आणि भागीदारीसाठी दक्षिण आशियाचे नवी दिल्ली येथे सल्लागार असलेले डॉ.उमाशंकर सिंग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. रमेश कुणकेरकर, सहयोगी संशोधक संचालक डॉ. शिवराम भगत व भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे उपस्थित होते.डॉ. कोहली पुढे म्हणाले की, सर्वसामान्य शेतकऱ्याचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावणे हे शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे.
ग्राहकांच्या पसंतीस उतरणाऱ्याच भात जाती शेतकरी पिकवतात असे नमूद करीत ते म्हणाले की, सामान्य व्यक्ती आपल्या आहारात ज्या भात जाती अन्न म्हणून प्रामुख्याने वापरतात त्या विकसित करण्याची गरज आहे.डॉ. उमा शंकर सिंग म्हणाले की, भात वाण प्रसारणापूर्वी शेतकऱ्यांना सामील करून प्रयोग आयोजित करायला हवे. अनेक वाणांची निर्मिती झाली असली तरी ते शेतकऱ्यांकडून उत्पादित केले जात नाही अथवा लोकप्रिय झालेले नाही. भारतात वाण बदलण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. भात पैदासकारांनी फक्त वाणनिर्मिती न करता जागरुकताही निर्माण करायला हवी, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. संजय सावंत यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात दोन्ही शास्त्रज्ञांच्या उपस्थितीबाबत त्यांना हार्दिक धन्यवाद दिले व सदर दोन्ही शास्त्रज्ञ विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांना कोणत्याही प्रकारची शास्त्रीय मदत अथवा पायाभूत सुविधा देण्यास उपलब्ध असतील, असे आश्वस्त केले. भात शेती शाश्‍वत व फायदेशीर होण्यासाठी सर्व शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करीत मोजक्याच सुविधांमध्ये ‘ स्पीड ब्रिडींग ‘ सुरू केल्याबद्दल त्यांनी त्यात सामील कर्जतच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

दूरदृश्यप्रणालीद्वारे सभेत मार्गदर्शन करताना विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे म्हणाले की, भात वाणाची निवड आणि पैदास कार्यक्रम राबविताना उद्देश परिपूर्तीसाठी शेतकर्‍यांचा सहभाग आवश्यक आहे.उत्पादन खर्च कमी करण्यासाठी भात शेतीत यांत्रिकीकरणावर जोर देत सेंद्रिय शेतीला प्रतिसाद देणाऱ्या जाती विकसित करण्याचा सल्ला त्यांनी दिला.डॉ.पराग हळदणकर म्हणाले की, कोकणात भात, आंबा व काजू या तीनच पिकांची दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड असून ‘ भात’ या एकमेव पिकाची खरीपात तांत्रिकदृष्ट्या लागवड केली जाते.
भाताच्या मूल्यवर्धित उत्पादनांना खूप वाव असल्याने भात शेती शाश्‍वत, वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.डॉ. शिवराम भगत म्हणाले की, कमी क्षेत्रफळाच्या जमिनी, विखंड, कमी बियाणे परतावा दर, खताचा अल्प वापर, संकरित भाताचे अत्यल्प क्षेत्र इ. बाबी कोकण विभागाच्या कमी उत्पादनामागील कारणे आहेत. जागतिक तापमानवाढ आणि बदलते वातावरण लक्षात घेता त्यास पूरक वाणनिर्मिती व कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत सेंद्रिय शेतीचे महत्त्व त्यांनी प्रतिपादित केले.

प्रास्ताविकात भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांनी ‘ देशातील भात सद्यस्थिती, समस्या व आव्हाने ‘ यावर सादरीकरण केले व महाराष्ट्रातील भात संशोधनाचा आढावा घेतला. मध्यम बारीक व पोषण मूल्यवर्धित भात वाण विकसित करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.कार्यक्रमाला कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद नरंगलकर, जैवतंत्रज्ञान विभाग प्रभारी डॉ. संतोष सावर्डेकर, शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. विजय दळवी, पनवेल खार जमीन शास्त्रज्ञ डॉ. किशोर वैद्य, कुलगुरूंचे स्वीय सहाय्यक डॉ. मनिष कस्तुरे हे व्यक्तीश: तर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातील ३५ अधिकारी व भात शास्त्रज्ञ दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्‍तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. आभार सहा. भात विशेषज्ञ डॉ. प्रवीण वनवे यांनी मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page