Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडगॅस्ट्रोचे रुग्ण आढळल्याने कर्जतमध्ये चिंतेचे वातावरण !

गॅस्ट्रोचे रुग्ण आढळल्याने कर्जतमध्ये चिंतेचे वातावरण !

मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील व नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांची पाणी जलशुद्धीकरण केंद्रास भेट !

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)वाढत्या अति उष्णतेमुळे नागरिकांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असताना या ३८ डिग्री उष्णतेत खाण्याच्या प्रकाराने पोटात ढवळाढवळ होत असल्याने गॅस्ट्रो सारखे आजार पालिका हद्दीत बळावत असल्याने पिण्याचे पाणी नागरिकांना स्वच्छ दिले जाते की नाही , याची पडताळणी आज कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील व नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांनी जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता त्यात काहीही दोष न आढळल्याने तरीसुद्धा भविष्यात पाणी गाळून उकळून प्यावे , म्हणजे उलटी – जुलाब सारख्या आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागणार नाही , असे आवाहन मुख्याधिकारी डॉ . पंकज पाटील यांनी समस्त कर्जतकरांना केले आहे.

आज उपजिल्हा रुग्णालयातुन वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज बनसोडे यांच्या माहितीनुसार रुग्णालयात ८ ते १० रुग्ण गुंडगे , दहिवली परिसरातून लहान मुले व तरुण उलटी व जुलाबाच्या साथीने ऍडमिट झाले असता त्यांनी खबरदारी म्हणून कर्जत नगरपरिषदेस एक पत्र पाठविले , ज्यामध्ये आठ ते दहा गॅस्ट्रोचे रुग्ण असल्याचे निदर्शनास आले , त्यामुळे तातडीने बैठक घेऊन नगराध्यक्ष सौ.सुवर्णा जोशी यांनी ज्या परिसरात रुग्ण सापडले आहेत त्या परिसराचे पाईपलाईनला कुठे लिकेज आहे का ? याची तपासणी करून घेण्यास सांगितले , तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी अलिबाग येथे पाठवले त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण केंद्रावर भेट दिली असता तिथे सर्व यंत्रणा व्यवस्थित चालू आहे , पाण्यात क्लोरीन पण व्यवस्थित दिले जात आहे ,तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे जरुरी आहे , त्यासाठी पाणी उकळून व गाळून पिणे , याबाबत जनजागृती व्हावी , म्हणून याबाबत रिक्षा फिरवून लोकांना आवाहन करण्यात आले.

तसेच उन्हा पासून काळजी घेणे असे आवाहन करण्यात आले . तर ऍडमिट रुग्णांची उपजिल्हा रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली तसेच डॉक्टर बनसोडे यांच्याशी चर्चा केली पेशंटची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळेस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ .पंकज पाटील , नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी , डॉ .मनोज बनसोडे व इतर वैद्यकीय अधिकारी , नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , आरोग्य अधिकारी सुदाम म्हसे, पाणीपुरवठा विभागाचे हरिश्चंद्र वाघमारे,विलास गायकवाड, मालू निरगुडा उपस्थित होते. नगरपरिषदेने तातडीने सर्व पावले उचलली असून,योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

अजून कुणाचे नातेवाईक किंवा असे रुग्ण आढळल्यास त्वरित सरकारी दवाखाना किंवा नगरपालिकेत कळवावे , असे आवाहन कर्जत न प चे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील व नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांनी आवाहन केले आहे.कर्जत नगर पालिकेतील जलशुद्धीकरण केंद्रात ऑटोमॅटिक क्लोरिनेशन प्लांट आहे .तिथं योग्य प्रमाणात क्लोरिन मिक्स केले जात आहे . तसेच शेवट पर्यंत येणाऱ्या पाण्यात योग्य प्रमाणात क्लोरिन आहे . काल पाण्याचे नमुने तपासले ते सुद्धा योग्य आहेत . उलटया आणि जुलाब याचे काही रुग्ण आढळले आहेत , याची कारणे जरी वेगळी असली तरी खबरदारी म्हणून नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे . तसेच बाहेरील पदार्थ आणि पेय पिऊ नये . असे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील व नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांच्या वतीने समस्त कर्जतकरांना आवाहन करण्यात येत आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page