Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडचुकीचा व अनेक त्रुटी तसेच कर्जतकरांना आक्षेप असलेला मालमत्तेचा सर्व्हे रद्द करून...

चुकीचा व अनेक त्रुटी तसेच कर्जतकरांना आक्षेप असलेला मालमत्तेचा सर्व्हे रद्द करून पुन्हा नव्याने सर्व्हे करा !

अशिक्षित कामगार वर्गाने हरकत न घेतल्यास वाढीव व चुकीचे मालमत्ता कर तसेच ठेवणार का ? स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा संतप्त सवाल…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या मालमत्तेचा सर्व्हे करून सन २०२४ ला लावण्यात येणाऱ्या कराबद्दल सध्या सावळा गोंधळ सुरू आहे . चुकीचा सर्व्हे व अनेक त्रुटी असलेले हे काम रद्द करून पुन्हा नव्याने सर्व्हे करण्याचीच मागणी आता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे . एव्हढा सावळा गोंधळ व कर्जतकरांना मनस्ताप दायक हि घटना होत असताना पालिकेतील सत्ताधारी बरोबरच विरोधी पक्ष मात्र मूग गिळून ” गप्पा ” च्या भूमिकेत असल्याने पुन्हा एकदा कर्जतकरांना लोकप्रतिनिधी यांनी पाणीपट्टी दरवाढ सारखेच ” वाऱ्यावर ” सोडल्याची घटना येथे घडली आहे.
कर्जत नगर परिषद हद्द हि आदिवासी – कामगार – कष्टकरी – गरीब वर्गाची वस्ती असलेले शहर आहे . येथे दर पाच वर्षांनी कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या मालमत्तेचे सर्व्हे केला जातो .ठेकेदारी पद्धतीने हे काम होत असते , यावेळी झालेल्या या सर्व्हेत पालिकेतील कर्मचारी यांना बरोबर घेऊन सर्व्हे झाला असता , तर सर्व कामे व्यवस्थित पार पडली असती , मात्र अशी सूचना लोकप्रतिनिधी यांनी मांडली नसल्याने आता सर्वच ठिकाणी ” घोळम – घोळ ” झाला आहे . नागरिकांच्या नावात बदल , चुकीचे नावे , मालकाची नावे उडवून भाडोत्री मालक दाखविणे , घराचे मोजमापात फरक , घर मातीचे , सिमेंट – वाळू , दगड की विटांचे आहे , याची काहीच माहिती सर्व्हे करणाऱ्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी आणली नाही.तर अनेकांचे सर्व्हे जागेवर जाऊन झाले नाहीत , तर अनेकांची घरे तुटली असून तिथे काहीच नसताना मालमत्ता कर लावण्यात आला आहे.
त्यातच नोटीसही न समजेल अश्या भाषेत काढल्या नसल्याने त्यातील भाषा कर्जतकर नागरिकांना काहीच समजली नाही , तर ” क ” वर्गात मोडणाऱ्या कर्जत न.प. ला कसा कर आकारावा , याचे ज्ञान देखील ठेकेदारांनी घेतलेले दिसत नाही , की त्यांना पालिका प्रशासनाने दिलेले नाही.या सर्व सावळा गोंधळामुळे याविरोधात नागरिकांचे , संघटनांचे व राजकीय पक्षांचे जनआंदोलन उभे राहिल्यावर लोकप्रतिनिधी जागे झाले आहेत . याबाबतीत पालिकेतील विरोधी पक्ष गट नेत्यांनी आक्षेप घेणे गरजेचे असताना ते ” मटणाच्या रेसिपीत ” गुंग असल्याची चर्चा आहे , तर सत्ताधारी लोकप्रतिनिधी ” ठेक्यात ” गुंतली आहे , त्यामुळेच पालिकेतील प्रशासनावर कुणाचा अंकुश राहिला नाही आणि म्हणूनच झोपेतून जागे झालेले लोकप्रतिनिधी दुसरा कुठला मार्ग काढण्यापेक्षा हा चुकीचा व नागरिकांना आक्षेप असलेला व हरकतींच्या ” चुकार ” कामापेक्षा झालेला मालमत्ता सर्व्हे रद्द करून पुन्हा नव्याने सर्व्हे करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचे चित्र सध्या या प्रकरणात दिसत आहे .याबाबतीत आता कर्जत न.प. चे मुख्याधिकारी गारवे काय निर्णय घेतात , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .अशिक्षित कामगार वर्गाने हरकती घेतल्या नाहीत , तर त्यांचे वाढीव व चुकीचे मालमत्ता कर तसेच ठेवणार का ? असा संतप्त सवाल स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page