Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडजातीयवाचक आक्षेपार्ह लिखाण केलेल्या आरोपीस अद्यापी अटक नाही !

जातीयवाचक आक्षेपार्ह लिखाण केलेल्या आरोपीस अद्यापी अटक नाही !

कर्जत तालुक्यातील बौद्ध समाज संतप्त…

भिसेगाव- कर्जत / सुभाष सोनावणे -आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात आता मोबाईलद्वारे सायबर क्राईमचे अनेक गुन्हे होत असून अश्या घटनांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन जातीय सलोखा बिघडण्याचे चित्र सर्वत्र दिसण्यात येत आहेत . मोबाईल वरून पैसे हेराफेरीच्या घटना , अश्लील प्रकरणाच्या घटना , हनी सेक्स ट्रॅपच्या घटना , अश्या प्रकारच्या घटना घडत असताना ज्या महापुरुषांनी आपले खडतर जीवन जगून सर्वसामान्य नागरिकांना हक्क अधिकार दिले , त्या घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल घृणास्पद आक्षेपार्ह सोशल मीडियावर लिहून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या घटना देखील कर्जत तालुक्यात आज घडत आहेत.
तालुक्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कमिटी बनविण्याचे आदेश दिलेले असताना हे अधिकार असणारे उपविभागीय पोलीस अधिकारी , व प्रांत अधिकारी कमिटी करता ” शेतातील बुजगावणे ” असतात तशी भूमिका आजही कर्जत तालुक्यात हे प्रमुख अधिकारी निभावताना दिसतात . त्यामुळे दिवसेंदिवस या जातीयवाचक घटना कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत.कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोदिवले येथे दि. ३० जुलै २०२२ रोजी रहाणारी आशा अनंत राणे या महिलेने व तिचा भाऊ प्रल्हाद अनंत राणे यांनी भारतीय राज्य घटना , घटनाकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर , व बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह लिखाण सोशल मीडियावर केल्याने कर्जत तालुक्यातील आंबेडकरी अनुयायीत संतप्त वातावरण तयार झाले होते.
बौद्ध बांधवांनी नेरळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन सदर महिलेस व तिचा भाऊ यांस त्वरित अटक करण्याची मागणी केली होती , मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी अद्यापी आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यानुसार त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 295 – A , 153 – A , अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक 67अधिनियम 3 (1) v व 3 (1) u अन्वये आरोपींना अटक केली नाही.
एक महिना उलटून गेला तरी आरोपीस अटक न होत असल्याने काल दि . १० सप्टेंबर २०२२ रोजी तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या कार्यालयात पोहचले व २० तारखेपर्यंत आरोपीस पुरावे गोळा करून अटक न झाल्यास २१ सप्टेंबर रोजी तालुका एकवटून संतप्त क्रोध मोर्चा आपल्या ” सुस्त कारभाराचा ” निषेध नोंदविण्यास येईल , असा ईशारा बौद्ध समाजाने निवेदनाद्वारे दिला आहे . यावर लगारे यांनी त्यापूर्वीच आरोपीस अटक होईल , असे आश्वासन दिले आहे.
मात्र अश्या प्रकरणात होत असलेल्या विलंबाला पोलीस अधिकारी विजय लगारे यांना जबाबदार धरून त्यांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहून त्यांची अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक इन्व्हेस्टींगेशन ऑफिसर पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी वरिष्ठ कार्यालयात करणार असल्याचे समस्त बहुजन वर्गाने सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page