Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभिसेगाव - गुंडगे - जुने एस टी स्टँड परिसरात पाण्याची बोंबाबोंब !

भिसेगाव – गुंडगे – जुने एस टी स्टँड परिसरात पाण्याची बोंबाबोंब !

कर्जत नगर परिषदेचे उपाय योजनेकडे दुर्लक्ष…

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)शिवशाहीमध्ये मंजूर झालेली व पुढे आघाडी सरकारने अंमलात आणलेली कर्जत पाणी पुरवठा योजनेला २० वर्षांचा कालावधी झाला असताना कर्जत नगर परिषदेकडे सुपूर्त केल्यावर आजपर्यंत वाढत्या नागरीकरण व इमारतींचा विचार करता कुठलीच उपाययोजना कर्जत नगर परिषदेने राबविली नसल्याने पालिकेच्या पश्चिम भागाकडे असलेल्या भिसेगाव – गुंडगे – जुने एस टी स्टँड – विश्वनगर परिसरात पाण्याची आता नेहमीच बोंबाबोंब चालू आहे.त्यामुळे येथील महिला वर्गात पालिकेच्या व सत्ताधारी यांच्या अशा गलथान कारभाराचा संताप पसरला असून लोकप्रतिनिधी देखील तक्रारी करूनही मूग गिळून गप्प असल्याने यावर कुठलाच मार्ग निघत नाही.

मध्यंतरी लोकार्पण सोहळ्यात कर्जत नगर परिषदेच्या सत्ताधारी पाणी पुरवठा सभापतींनी खासदार आमच्या महायुतीचे , आमदार आमच्या महायुतीच्या पक्षाचे तर कर्जत नगर परिषदेत आमचा नगराध्यक्षा असताना पाण्याची समस्या का सुटली जात नाही , असा यक्षप्रश्न उपस्थित केला होता.वाढत्या नागरिकरणासाठी जुने एस टी स्टँड परिसरात वाढीव पाण्याची टाकी बांधणे गरजेचे आहे ,तर भिसेगाव परिसरात देखील अरिहंत टॉवरला बेकायदेशीर नियमाच्या बाहेर जाऊन मोठी पाणी सप्लाय दिलेली असल्याने या परिसरात देखील पाण्याची गेली दोन महिने पासून बोंबाबोंब चालू आहे ,मात्र याकडे देखील सत्ताधारी व पालिका प्रशासन लक्ष देत नाहीत.

दैनंदिन कामासाठी पाणी अपुरे पडत असल्याने महिलांना याचा त्रास सहन करावा लागत असून वर्षाकाठी पाणीपट्टी कशी मागता , मग नियमाप्रमाणे पाणी का देत नाहीत , असा संतापजनक सवाल ते करीत आहेत.दोन वर्षांपूर्वी पाण्याच्या पाईप लाईनला मीटर बसविले होते , त्यात देखील लाखों रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून मिटरप्रमाणे बिल आकारत नसल्याने व ते मीटर देखील खराब झाल्याचे दिसून येत आहेत.

त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याच्या तुटवड्यामुळे सत्ताधारी पक्षांची प्रतिमा मलिन होत असून खालपासून वरपर्यंत सत्ता असताना पाणी समस्या प्रश्न दूर करण्यास कर्जत नगर परिषदेच्या सत्ताधारी पक्षाला अपयश का येत आहे , याचे कारण सध्यातरी गुलदस्त्यात बंद आहे ,मात्र सध्याचे संतापाचे वातावरण भविष्यात नगरसेवकांना ग्रहण लागण्याचे लक्षण दिसून येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page