Friday, March 29, 2024
Homeपुणेमावळमावळातील जमीन प्रकरणात तहसीलदारांनी पदाचा गैरवापर केला,अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन...

मावळातील जमीन प्रकरणात तहसीलदारांनी पदाचा गैरवापर केला,अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचा आरोप…

मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील जमीन प्रकरणात तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.
मावळच्या तहसीलदारांनी पदाच्या अधिकाराचा गैरवापर करत शेतजमीन न्यायाधिकरणाच्या तरतुदींविरुद्ध कामकाज चालवून जमीन प्रकरणात बेकायदेशीर आदेश पारित केले असल्याचा आरोप अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे तालुकाध्यक्ष ऍड.संजय पाटील आणि कार्याध्यक्ष जमीर नालबंद यांनी पत्रकार परिषदेत केला.यावेळी शहर उपाध्यक्ष नवनाथ कुल व तक्रारदार शेतकरी सूर्यकांत काळोखे उपस्थित होते.
याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत मावळचे उपविभागीय अधिकारी , तहसीलदार , संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांना त्वरित निलंबित न केल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला . पत्रकार परिषदेत तक्रारदार शेतकरी सूर्यकांत काळोखे यांनी त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचा दावा केला . तसेच मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी काही दलालांबरोबर संगनमत करून पोकळीस्त नोंदीचा गैरफायदा घेत कुळकायदा नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर आदेश पारित केले असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
जमीर नालबंद व व ऍड.पाटील म्हणाले , की जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागाने मावळ तहसीलदारांच्या कार्यकाळातील न्यायालयीन प्रकरणांची तपासणी करण्याकामी चौकशी पथक नेमण्याचे व तक्रारदार काळोखे यांच्या अर्जातील मुद्द्यांची चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह कागदपत्रांनीशी अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिलेत.
तसेच या प्रकरणाची चौकशी दबावाखाली होऊ नये म्हणून उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्यासहित तहसीलदार बर्गे , संबंधित मंडल अधिकारी व गावकामगार तलाठी यांना त्वरित निलंबित करावे . अन्यथा पीडित शेतकऱ्यांसह न्यासाचे पदाधिकारी वडगाव मावळ तहसीलदार कार्यालयासमोर येत्या 15 तारखेपासून बेमुदत उपोषण करतील , असा इशारा त्यांनी दिला.
- Advertisment -

You cannot copy content of this page