Friday, April 19, 2024
Homeपुणेमुख्यामंत्र्यांची मोठी घोषणा मराठी पत्रकार परिषद अधिवेशनासाठी देणार 25 लाख…

मुख्यामंत्र्यांची मोठी घोषणा मराठी पत्रकार परिषद अधिवेशनासाठी देणार 25 लाख…

पुणे (प्रतिनिधी) : पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल , असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले . पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै. शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते .
यावेळी खासदार श्रीरंग बारणे , आमदार महेश लांडगे , मनपा आयुक्त शेखर सिंह , जिल्हाधिकारी डॉ . राजेश देशमुख , पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , परिषदेचे मुख्य विश्वस्त एस . एम . देशमुख , विश्वस्त किरण नाईक , परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे , मिलिंद अष्टीकर , विनोद जगदाळे , अरुण कांबळे , सुनील लोणकर , बाबासाहेब ढसाळ आदी उपस्थित होते .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले , शासन आणि पत्रकार दोन्ही समाजासाठी काम करतात . कोविड काळात शासन , लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी एकत्रितरित्या संकटाचा सामना केला . वृत्तांकन करताना पत्रकारांना अनेक आवाहनांना सामोरे जावे लागते . बातमी मिळविताना पत्रकारांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते . पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल , तसेच अधिस्वीकृती समिती लवकरच स्थापन करण्यात येईल . मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी 25 लाख रुपये देण्यात येतील , असे त्यांनी सांगितले .
राज्याला पुढे नेण्यासाठी विकास पत्रकारिता महत्त्वाची असेही मुख्यमंत्री म्हणाले , पत्रकार सकारात्मक दृष्टिकोनातून काम करीत असतात . लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे . ते सातत्याने समाजाचे प्रश्न मांडतात , स्वातंत्र्यपूर्व काळात दर्पणकारांपासून ही परंपरा सुरू आहे . विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकार कठीण परीस्थितीत आपले कर्तव्य पार पाडतात . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्याला पुढे नेताना विकास पत्रकारितेचे महत्वाचे योगदान आहे आणि भविष्यातही राहील .
मराठी पत्रकार परिषदेने मराठी माणसाचा विचार पोहोचविण्याचे कार्य केले मराठी पत्रकार परिषद देशातील पहिली संघटना आहे . 83 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संघटनेने गोवा , बेळगाव , बिजापूर , कारवार आणि महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील शाखांसह संयुक्त महाराष्ट्र साकारला याचा सर्वांना आनंद आहे . आचार्य अत्रे , बाळासाहेब भारदे , नरेंद्र बल्लाळ , नारायण आठवले , अनंत भालेराव अशा मोठ्या व्यक्तिमत्वांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले . परिषदेने मराठी माणसाचे विचार पोहोचविण्याचे कार्य केले . गतिमान वृत्तांकनात बातमीतील सत्यता राखण्याचे मोठे आवाहन आज समाज माध्यमामुळे वृत्तांकन गतिमान होत आहे.
चहूबाजूने माहितीचा मारा होत असताना बातमीत सत्यता राखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे . वाचकाचा विश्वास कायम ठेवण्याचे आवाहनही आहे. आणि म्हणून संघटनेची प्रबोधनाची भूमिका महत्त्वाची आहे . चौथा स्तंभ असलेली माध्यमे आणि शासनाने हातात हात घालून काम करण्याची गरज आहे . शासनाचे जिथे लक्ष जात नाही अशा भागातील समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचे काम पत्रकार करतात , त्यामुळे एकप्रकारे शासन प्रशासनाला मार्गदर्शन होते आणि नागरिकांना न्याय मिळतो.
प्रास्ताविकात देशमुख यांनी अधिवेशनसंबंधी माहिती दिली.ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न अधिवेशनाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले . श्री.कांबळे , शशिकांत झिंगुर्डे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . चित्रकार नंदू शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांचे काढलेले छायाचित्र भेट दिले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कै . स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे स्मृती आरोग्य पत्रकारिता पुरस्कार संदीप आचार्य यांना प्रदान करण्यात आला . मराठी पत्रकार परिषदेतर्फे या वर्षीपासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे . पत्रकार विनोद जगदाळे , पिंपरी चिंचवड कर्मचारी संघटनेचे शशिकांत झिंगुर्डे , सुप्रिया चांदगुडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
- Advertisment -

You cannot copy content of this page