Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडया जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे, भरकटलेल्या त्या आजीस भेटले...

या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे, भरकटलेल्या त्या आजीस भेटले देवदूत..

पोलीस मित्र संघटना व कर्जत पोलीस ठाण्याचे अभूतपूर्व कार्य..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
या धरतीतलावर प्रत्येक मनुष्याचे एक कौटुंबिक वर्तुळ आहे,त्यात त्याचे आई – बाबा – भाऊ – बहीण -मुले,पती ,तसेच इतर नातेवाईक – मित्रगोत्र असे संबंध जोपासत लहानाचे तरुण वयात येतात तर नंतर वृद्ध असे निसर्गाचे चक्र असताना मात्र असेच कोणी आपल्या कौटुंबिक वर्तुळापासून मेंदूवर मानसिक आघात होऊन घरातून दूर निघून गेल्यावर त्यांना शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.

जग जरी खूप मोठे असले ,तरी दैवबलवत्तर असल्यानेच अशी व्यक्ती देवरूपी माणसांच्या निदर्शनास येतात, त्यांच्यावर योग्य व वेळीच उपचार होऊन मार्ग सापडून पुन्हा आपल्या कुटुंबात सुखरूप त्या पोहचतात.गेली कित्येक दिवस कोरोनाने अवघ्या जगात थैमान घातले असताना आणि लॉकडाऊनमुळे सर्व यंत्रणा थांबलेली असताना आलेल्या परिस्थितीचा अनेकांवर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे.

स्वताच्याच तंद्रीत रस्त्यावर फिरणारे ,फाटके – तुटके- मळके कपडे घातलेले ,केस वाढून घाणेरडे ,थकलेले ,सुकलेले , अर्धनग्न ,स्वताच्याच दुनियेत हरविलेले ,स्वताशीच बोलत बसणारे ,उकिरड्यावरचे खाणारे ,कोणत्याही हक्क व कर्तव्यापासून कोसोदूर परंतु माणूस असणारे ,अश्याना पुन्हा माणूस म्हणून जगण्याचा सन्मान मिळवून देणारे माणसातील देव या जगात सर्वत्र आढळतात.

त्या हरवलेल्या व्यक्तीचा मी पण पुन्हा पदरात घालून त्यांना त्यांच्या कुटुंबात पाठवून निसर्गाने दिलेल्या ” मनमुराद जगण्याचा ” हक्क मिळवून देण्यास मदत करतात.ही कुठली कथा नसून कर्जत नगर परिषद हद्दीतील नाना मास्तर नगर प्रभागात घडलेली घटना आहे.कर्जत नगर परिषद हद्दीतील नाना मास्तर नगरमधील काही जागरूक नागरिक व देवदूतांमुळे एका ६५ वर्षीय आजींना आपलं कुटुंब पुन्हा मिळालं आहे.

नाना मास्तर नगरमध्ये पोलिस मित्र संघटनेचे सचिव प्रितेश बोंबे यांच्या घरासमोर मंगळवार दि.३ ऑगस्ट २०२१ रोजी एक आजी भुकेल्या आणि अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत दिसून आल्या.या आजींची अवस्था पाहून पोलिस मित्र संघटनेचे सचिव प्रितेश बोंबे,सामाजिक कार्यकर्ते भानुदास पालकर आणि संदेश मोरे त्या ठिकाणी हजर झाले. या आजी भुकेल्या अवस्थेत असल्याने या नागरिकांनी त्यांना सर्व प्रथम खायला आणि अंगावर कपडे दिल्यानंतर कर्जत पोलीस ठाणे येथे कॉल करून याबाबत माहिती देण्यात आली.

पोलीस या वृद्ध महिलेला कर्जत पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले.विचारपूस केल्यानंतर या आजींनी त्यांच्या कुटुंबीयांची माहिती दिली.या ६५ वर्षीय आजींचे नाव शकुंतला गोडे असं असून मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये त्या हरवल्या असल्याची तक्रार त्यांच्या मुलांनी नोंदवली होती.कर्जत पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवत काही तासात या आजींच्या कुटुंबीयांचा शोध घेतला.

कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या प्रयत्नाने अखेर या आजींच्या मुलांसोबत संपर्क झाला असून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.सामाजिक कार्यकर्ते भानुदास पालकर, पोलिस मित्र संघटनेचे सचिव प्रीतेश बोंबे, भूषण कडू, नीरज कोकणे, प्रकाश लोहट,राज राणे यांनी या आजींना आपलं घर मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जे कर्म केले जाते,ती सेवा म्हणजे परमेश्वराची ईश्वरसेवा ठरते.हेच या ६५ वर्षीय आजींच्या चेहऱ्यावर आपल्या कुटुंबातील माणसे बघितल्यावर दिसले ,व हे सर्व या देवदूतांमुळेच घडले.

- Advertisment -

You cannot copy content of this page