Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडलेनची शिस्त न पाळता अति वेगाने वाहन चालवणे पडते महागात, माडप बोगद्या...

लेनची शिस्त न पाळता अति वेगाने वाहन चालवणे पडते महागात, माडप बोगद्या जवळ भीषण अपघात…

खालापूर (प्रतिनिधी) : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ सातारा जिल्ह्यातून कोपरखैरणे येथे निघालेल्या इको कारने समोरील ट्रकला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात इको कार मधील प्रवाशांपैकी एक महिला आणि एक पुरुष आशा दोघांचा मृत्यू झाला असून , किरकोळ तसेच गंभीर जखमी झालेल्या इतर दहा जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या कोंढावळे येथून कोपरखैरने , नवी मुंबई येथे निघालेल्या मारुती इको कार मध्ये चालक आणि अन्य 15 जण बसले होते . मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या दिशेने माडप बोगद्या जवळ सदर कार आली असता रस्त्याच्या कडेला आपला पंक्चर झालेला टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या एक ट्रकला ( के ए – 56 – 2799 ) या कारने मागून धडक दिली . ही धडक एवढी गंभीर होती की , इको कार मधील सर्वच प्रवाशांना इजा झाली . त्यातील महिला लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर ( वय -24 ) व गणेश बाळू कोंढाळकर ( वय -22 , रा . कोंढावळे , ता . वाई , जिल्हा – सातारा ) यांचा जागीच मृत्यू झाला आहे , तर इतर जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . त्यातील सहा ते सात जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत त्यांची प्रकृती नाजूक आहे .रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ खोळंबली होती . इको कार मधील जखमींना बाहेर काढण्यासाठी आय आर बी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेला मोठी शिकस्त करावी लागली.

अपघात झाल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणेंसोबत डेल्टा फोर्स , लोकमान्य हॉस्पिटलच्या रुग्णवाहिका , पळस्पे वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस , खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी , अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले होते . सदर अपघाताची भीषणता लक्षात घेत खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला आणि खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळा कुंभार यांनी घटनास्थळाला भेट दिली तसेच एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

प्राथमिक माहिती नुसार इको कारचा चालक अंकुश राजाराम जंगम ( वय 32 ) याने लेनची शिस्त न पाळता , भरधाव वेगाने कार चालवल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page