Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा शहरात आजपासून एकेरी वाहतुकीची कडक अंमलबजावणी...

लोणावळा शहरात आजपासून एकेरी वाहतुकीची कडक अंमलबजावणी…

लोणावळा : लोणावळ्यात आजपासून एकेरी वाहतुकीची
कडक अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी चौक ते भांगरवाडी एकेरी वाहतुकीची कडक अंमलबजावणी होत आहे. यामुळे लोणावळा बाजार भागात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार केलेला हा बदल आज पहिल्याच दिवशी 80% यशस्वी होत आहे, तर लोणावळा वासियांना या एकेरी वाहतुकीची सवय होत असताना 100 % एकेरी वाहतूक पूर्ण पणे यशस्वी होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी दिली.

काही वर्षापूर्वी लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भांगरवाडी इंद्रायणी पुल दरम्यान एकेरी वाहतुकीचा प्रयोग यशस्वीपणाने राबविण्यात आला होता . कोरोना काळात व त्यानंतर पंडित नेहरु रोडचे काम यामुळे ही एकेरी वाहतूक बंद करण्यात आली होती.आज पासून मात्र पुन्हा एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.या नविन बदलानुसार भांगरवाडी बाजुला जाणारी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे जातील व भांगरवाडीकडून लोणावळा बाजारपेठ व पुढे गवळीवाडा नाका भागात जाणारी वाहने इंद्रायणी पुलावरून पुरंदरे शाळेच्या समोरून , संजिवनी हॉस्पिटल , रानडे दवाखाना येथून लोणावळा शहर पोलीस ठाण्यासमोरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतील . या दोन्ही मार्गावरील दुकानदार व नागरिक यांनी त्यांची वाहने रस्त्यावर उभी करू नयेत.

प्रवासी वाहनांना जाण्यासाठी रस्ते मोकळे ठेवायचे असल्याचे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे . छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच इंद्रायणी पुल येथे पोलीस व वॉर्डन तैनात करण्यात आले आहेत आणि ते आपली कामगिरी चोख बजावत आहेत.तसेच एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी , कर्मचारी यांच्याकडून लाऊड स्पीकर द्वारे नागरिकांना सूचनाही देण्यात येत आहे.

नागरिकांनी देखील या बदलाप्रमाणे वाहने चालवावीत व शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी यंत्रणांना सहकार्य करावे . सर्वांच्या सोयीसाठी व सर्वांच्या मागणीनुसार हा बदल करण्यात आला आहे . त्यामुळेच सामोरे जायचे आहे ,येथेच राहतो अशी कारणे न सांगता नेमून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा व वाहतूककोंडी कमी करण्यासाठी सहकार्य करावे , पोलीस कर्मचारी अथवा वॉर्डन यांच्याशी हुज्जत घालू नये . नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार असल्याचे आवाहन लोणावळा शहर पोलीस व लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page