Saturday, April 20, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात स्वातंत्र्यदिनी "आजादी का अमृत महोत्सव "या कार्यक्रमाचे विशेष आयोजन...

लोणावळ्यात स्वातंत्र्यदिनी “आजादी का अमृत महोत्सव “या कार्यक्रमाचे विशेष आयोजन…

लोणावळा दि.15 : लोणावळा येथील जैन श्रावक संघ परिवाराने पारंपारिक चातुर्मास कार्यक्रमाचे औचित्य राखून गुरुवर्या श्रमणी प. पू. अर्चनाश्री म.सा. व सुरभीश्री म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त “आजादी का अम्रुत महोत्सव” कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले. या कार्यक्रमाद्वारे गुरुवर्या अर्चनाश्री यांनी भारताच्या सुमारे तीन हजार वर्षांपासूनच्या गौरवशाली इतिहासाचा लालित्यपूर्ण आढावा घेत वैविध्यपूर्ण वेशभूषेद्वारे ऐतिहासिक चरित्रांचे अद्भुत दर्शन घडविले. अबालव्रुद्धांनी या सादरीकरणात योगदान देऊन उपस्थितांची मने जिंकली आणि गौरव अनुभवला.

देशभक्तीपर गीतांवर तरुणांनी न्रुत्ये सादर करीत भक्तीभावाचे प्रदर्शन केले.प्रथमच आयोजिलेल्या ध्वजारोहणाचा मान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व्हीपीएस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तसेच सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट विजय जोरी यांना देण्यात आला. जोरी सरांनी आपल्या ओघवत्या भाषणाद्वारे नगरपालिका, जैन संघ व समस्त लोणाळेकरांना धन्यवाद दिले. स्काऊट चळवळीचा परिचय करुन दिला.


याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व भरत हारपुडे यांच्या हस्ते जेष्ठ सदस्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. नगरसेवक संजय घोणे व मंदा सोनवणे यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली. स्काऊट गाईड परिवारातर्फे गाईडर रत्नप्रभा गायकवाड, वार्ताहर श्रावणी कामत, अस्मिता शिंदे, रोव्हर आशीष जांगीर आणि सहा गाईड उपस्थित होते.
सुरेखाताईंनी राष्ट्रीय वसुंधरा उपक्रमाबाबत माहिती देत सदर कार्यक्रमात योगदान देण्याबाबत आवाहन करीत स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाची प्रस्तावना जैन संघाचे युवा पदाधिकारी जयेश संचेती यांनी केली, अमोल नहार यांनी मान्यवरांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन इषिता लुंकड, प्रतिक्षा बंबोरी, अमित लुणावत या युवा कार्यकर्त्यांनी केले. जैन आर्या युवती मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमाची रचना व तयारी केली. कन्हैया भुरट यांनी मान्यवरांचे आभार मानले. कोरोना संबंधित नियमांचे पालन करीत समारंभ उत्सहात संपन्न झाला.

- Advertisment -

You cannot copy content of this page