Wednesday, April 17, 2024
Homeपुणेवडगाववडगांव शहरातील सात दिवसीय बाप्पांना भावपुर्ण वातावरणात निरोप...

वडगांव शहरातील सात दिवसीय बाप्पांना भावपुर्ण वातावरणात निरोप…

वडगांव मावळ (प्रतिनिधी) : शहरातील 7 व्या दिवशी गणेशोत्सव मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत शहरातील गणेश मंडळांनी ढोलपथक, बॅंड, डिजे आदीचा वापर करीत मिरवणूक शांततेत पार पडली. पाऊस असूनही मोठय़ा संख्येने गणेशभक्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

वडगाव येथे 7 दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचे आज विसर्जन मिरवणुकीने समारोप झाला. वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या मानाच्या गणपतीने सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीस सुरुवात झाली. यात जय बजरंग तालीम मंडळ, सिद्धीविनायक मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळाचे गणपती सामील झाले होते. या मिरवणुकीत सर्वच राजकीय पक्षाचे मान्यवर उपस्थित होते.

त्याचप्रमाणे सायंकाळी पाच नंतर बालविकास मित्र मंडळ, जय जवान जय किसान मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, जयहिंद मंडळ, गणेश तरुण मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, द्विगवीजय मित्र मंडळ, कानिफनाथ मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, विजय नगर मित्र मंडळ, पंचमुखी मित्र मंडळ, नवचैतन्य मित्र मंडळ, इंद्रायणी मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, योगेश्वर मित्र मंडळ, शिवशंभो मित्र मंडळ ढोल पथक, पंचशील मित्र मंडळ यांसह इतरही मंडळानी ढोल पथक, बॅंड पथके, डिजे इत्यादी वाद्यांसह मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता . या सर्व मंडळांनी आकर्षक फुल सजावट आणि रोषणाई करून थाटात विसर्जन मिवणूक काढली.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर वडगाव नगरपंचायतच्या वतीने नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांसह नगरसेवक, नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि मित्र परिवार आदींने स्वागत केले.वडगाव नगरपंचायतच्या वतीने विसर्जन मार्गावरील सर्व श्रीगणरायांना पुष्पहार अर्पण करून गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष यांना सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक विलासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पोलिसांनी भर पावसात चोख पोलीस बंदोबस्त ठेवत सहकार्य करून शेवटी आनंदोत्सवात सहभागी झाले होते.
यावर्षी वडगांव मावळ मोरया ढोल पथकाचे वादन कलेत यशस्वी अकरावे वर्ष असताना सर्वच सदस्यांनी भर पावसात न थकता न थांबता आपल्या कलेचे सादरीकरण करत वाहवा मिळवली.तर यावेळी विसर्जन मार्गावर वडगाव शहर बजरंग दलाच्या वतीने सर्व मंडळांना सन्मानित करण्यात येत होते.


वडगाव शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळानी विसर्जन मिरवणुक उत्साहाने, शांततेत आणि वेळेत पूर्ण केली.गणेश मंडळासह शहरवासीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी पण आनंदात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

- Advertisment -

You cannot copy content of this page