Friday, March 29, 2024
Homeपुणेवडगाववडगाव नगरपंचायतच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया संबंधित प्रशिक्षण शिबिराचे आयोजन...

वडगाव नगरपंचायतच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया संबंधित प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…

वडगाव :वडगाव नगरपंचायतच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने शहरातील सदनिकांना घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया संबधित प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, होम कंपोस्टिंग, स्वच्छ भारत अभियान याविषयावर मा. जयप्रकाश पराडकर (घनकचरा व्यवस्थापन सल्लागार ) व मोहन पुजारी (प्रकल्प व्यस्थापक रोटरी क्लब, पुणे उत्तर) यांच्या मार्फत शहरातील ५० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहरचना संस्थाना घनकचरा प्रक्रिया प्रशिक्षण देण्यात आले.


घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६, कलम (४) मधील अनुक्रमांक ६,७ व ८ नुसार “ही अधिसूचना प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून एका वर्षाच्या आत सर्व संघटित समुदाय आणि संस्था ज्यांचे क्षेत्र ५ हजार चौरस मीटरहून अधिक अथवा ५० हून अधिक सदनिका आहे त्यांनी स्थानिक संस्थेच्या सहभागाने कचरा निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण केलेला कचरा स्वतंत्रपणे ठेवावा.

पुर्नप्रक्रिया करणे योग्य वस्तू एक तर कचरा उचलणाऱ्या अधिकृत व्यक्तिंना द्याव्यात किंवा पुर्नप्रक्रिया करणाऱ्या अधिकृत संस्थेस द्याव्यात. जैविकरित्या कुजवण्या योग्य कचऱ्यावर संस्थेच्या आवारात जागीच प्रक्रिया करावी आणि त्याचे खत तयार करून अथवा जैविक मिथेनिकरण करून विल्हेवाट लावावी. उरलेला घनकचरा स्थानिक अधिकृत संकलकास अथवा त्याच्या प्रतिनिधी संस्थेस द्यावा” अशी तरतूद आहे.


घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ तील तरतुदीच्या अनुषंगाने आपल्या गृहनिर्माण संस्थेत / गृहरचना संस्था / व्यावसायिक संकुल या मध्ये दैनंदिन स्वरुपात ५० कि. ग्रॅ. पेक्षा जास्त कचरा निर्माण होत आहे त्यामुळे आपण आपल्या आस्थापनेच्या आवारात ओल्या कचऱ्या पासून कंपोस्ट खत निर्मिती करावयची आहे व सुका कचरा पुर्नप्रक्रिया साठी पाठवायचा आहे.

त्या अनुषंगाने मान्यवरांचे गृहरचना संस्था प्रतिनिधीना होम कंपोस्टिंग बाबत व सुका कचरा पुनर्वापर बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी गृहरचना संस्था प्रतिनिधी यांना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कंपोस्ट खत बनविण्याचे आव्हान केले तसेच ज्या सोसायटी घनकचऱ्यावर प्रक्रिया करतील त्यांना ठराव पारित करून मिळकत करात काही प्रमाणात सवलत देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी मुख्याधिकारी जयश्री काटकर, उपनगराध्यक्ष पूजा वहिले, आरोग्य समिती सभापती माया चव्हाण, नगरसेविका पूनम जाधव, किरण म्हाळसकर आणि शहरात सदनिका असलेल्या सोसायटीचे प्रतिनिधी व नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page