Friday, April 19, 2024
Homeपुणेमावळवरसोली व सोमाटणे टोल नाक्यांवर स्थानिकांना मिळणार दिलासा...

वरसोली व सोमाटणे टोल नाक्यांवर स्थानिकांना मिळणार दिलासा…

तळेगाव दाभाडे : सोमाटणे व वरसोली टोलपासून मावळवासीयांना लवकरच दिलासा मिळणार आहे . सोमाटणे टोल नाका हटाव सर्व पक्षीय कृती समितीच्या आंदोलनाला यश आले असून पहिल्या टप्प्यात मावळ तालुक्यातील स्थानिक नागरिकांना सोमाटणे व वरसोली टोलनाक्यावर लवकरच कायमस्वरूपी टोलमुक्ती मिळणार आहे . टोलमाफीसाठी येत्या 15 दिवसांत रस्ते विकास महामंडळाकडून स्थानिकांना स्टिकर देण्यात येणार आहे . तरी सोमाटणे येथील अनधिकृत टोलनाका कायम स्वरुपी हटविण्यासाठी न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार असल्याची माहिती सोमाटणे टोल नाका हटाव सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने मंगळवारी दि .10 रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली .

यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे , भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे , शहाराध्यक्ष रवींद्र माने , अमोल शेटे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे , शहराध्यक्ष गणेश काकडे , आशिष खांडगे , शिवसेनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय भेगडे , सुनील मोरे , मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर , सचिन भांडवलकर , आरपीआयचे सुनील पवार , अनिल भांगारे , जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत , कल्पेश भगत , समीर खांडगे आदी उपस्थित होते . सोमाटणे टोल नाका हटाव सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनाचे गांभीर्य पोलीस प्रशासनाला आहे . मात्र रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबी प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप गणेश भेगडे यांनी यावेळी केला .

अनधिकृत असलेला सोमाटणे टोलनाका कायमस्वरूपी हटविण्यासाठी न्यायालयीन लढाई यापुढेही चालूच राहील . हा प्रश्न धसास लावण्यासाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा किशोर आवारे यांनी यावेळी दिला . गणेश खांडगे , रुपेश म्हाळसकर , सुनील मोरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या . सोमाटणे टोलनाका कायम स्वरुपी बंद व्हावा या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मंगळवारी दि .10 सोमाटणे टोल नाक्यावर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता . याची दखल घेत पोलीस प्रशासनाने शनिवारी दि .7 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे , पोलीस उपायुक्त आनंद भोईटे , काकासाहेब डोळे , सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले , तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत , सर्व पक्षीय टोल हटाव कृती समितीचे किशोर आवारे , गणेश खांडगे , मिलिंद अच्युत , सुनील मोरे आदी उपस्थित होते .

या बैठकीत मावळ तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोल मुक्ती व सोमाटणे टोल कायमचा हटवावा या संदर्भात चर्चा झाली . चर्चेतून मार्ग काढण्याचा निर्णय झाला . पोलीस प्रशासनाने रस्ते विकास महामंडळाचे चीफ कंट्रोलर ऑफ टॉल के . बी . फंड यांच्याशी फोनवरून संपर्क साधला . पोलीस प्रशासनाने केलेल्या शिष्टाईमुळे मावळ तालुक्यातील स्थानिकांना टोल मुक्तीसाठी स्टिकर मिळणार आहेत . या विशेष स्टीकरमधून स्थानिकांची टोलमधून कायमची सुटका होणार आहे . त्यांच्या फासटॅगमधून टोलचे शुल्क वजा होणार नाहीत . हा सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीचा पहिल्या टप्प्यातील विजय असून जोपर्यंत सोमाटणे टोल नाका कायम स्वरुपी बंद होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याची माहिती सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीने पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisment -

You cannot copy content of this page