Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडवावोशी येथे सुरू असलेले पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात….

वावोशी येथे सुरू असलेले पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात….


ठेकेदार सदर काम चुकीच्या पद्धतीने करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप…


खालापूर(दत्तात्रय शेडगे)वावोशी येथील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या नाल्यावरील जुना पूल धोकादायक झाल्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. ठेकेदाराकडून सदर बांधकाम निकृष्ठ दर्जाचे तसेच चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

खालापूर तालुक्यातील वावोशी फाटा ते परखंदे आदिवासीवाडी या चार किलोमीटर अंतरावरील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे पावने तीन कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामात गावातील प्रवेशद्वाराजवळील मुख्य पूल, गावातील नवीन मोऱ्यांचे बांधकाम तसेच रस्त्यालगतची गटारे यांचा समावेश आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली असून अद्याप रस्त्याचे डांबरीकरणाचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. अशातच मुख्य पुल ठेकेदाराकडून डिसेंबर मध्ये पाडण्यात आला. आज मीतीस चार महिने होत आले तरी संबंधित ठेकेदाराकडून पुलाचे बांधकाम पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. सदरील बांधकामाची ग्रामस्थांनी पाहणी केली असता पुलाचे बांधकाम हे चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आले.

पावसाळ्यात नाल्यातून खूप मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाण्याचा विसर्ग लक्षात न घेता पूलाची कमी करण्यात आलेली रुंदी, उभ्या केलेल्या खांबांचे ढासळत असलेले बांधकाम तसेच मुख्य म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला उभा करण्यात येत असलेला पुल पावसाळ्यातील पुराच्या पाण्यामुळे नुकसानग्रस्त होऊ शकतो असे झाल्यास वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग नसल्याने वावोशी, परखंडे, कोयना वसाहत, भीमनगर, तसेच चार आदिवासी वाडी यांचा जनसंपर्क तुटू शकतो या भीतीने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

सदरील पुलाच्या बांधकामाची पाहणी करण्याकरिता मुख्य अभियंता सौ. निकिता गुरव, दिनेश परदेशी यांना ग्रामस्थांनी बोलावून सत्य परिस्थिती निदर्शनास आणून देत जाब विचारला यावर आक्रमक ग्रामस्थांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत संबंधित ठेकेदारांची चौकशी लावून संपूर्ण बांधकाम मे अखेरीस पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन दिनेश परदेशी यांनी उपस्थितांना दिले.यावेळी वावोशी सरपंच प्रभाकर छत्तसकर, गोविंद वालम, हरिश्चंद्र हातनोलकर, राजू आडावकर, पद्माकर यादव, राम वाघमारे, मिलिंद मोरे, संजीत भोसले, कडू, संदीप आंबेरकर, किशोर आडावकर, चरण उदेकर, योगेश भाऊड, नंदु शहासने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page