Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसंतोष पवार मृत्यू प्रकरणी आरोग्य यंत्रणेला जबाबदार धरावे-कुटुंबीय आणि पत्रकारांची मागणी...

संतोष पवार मृत्यू प्रकरणी आरोग्य यंत्रणेला जबाबदार धरावे-कुटुंबीय आणि पत्रकारांची मागणी…


नेरळ,ता.10 पहाटे आलेला खोकला चार-पाच तासात मृत्यू पर्यंत नेतो हे संतोष पवार यांच्या मृत्यूने स्पष्ट झाले आहे.परंतु,रुग्णालयात उपचार सुरू असताना लावलेला ऑक्सिजन पुरवठा नंतर ऑक्सिजन सिलेंडर संपल्याने बंद झाला.त्यावेळी ऑक्सिजन सिलेंडर बदलताना झालेल्या किरकोळ चुकीमुळे ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आणि ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने पत्रकार संतोष पवार यांचा 9 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता.
दरम्यान,माझ्या वडिलांच्या मृत्यूस शासनाची आरोग्य यंत्रणा जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे पवार यांच्या कुटुंबाने जिल्हा शल्य चिकित्सक आणि रायगड जिल्हाधिकारी यांना केली आहे.

9 सप्टेंबर 2020 रोजी पहाटे त्यांना जोरजोरात खोकला येऊ लागला आणि त्यावेळी श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने आम्ही संतोष धोंडू पवार यांना खासगी रुग्णवाहिकेतून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सकाळी साडेआठ वाजता आणले.तेथे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मनोज बनसोडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ जयश्री म्हात्रे यांनी संतोष पवार यांची तपासणी केली.त्यावेळी पवार यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण 40च्या खाली आल्याने तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करण्यात आला.
तासाभरात संतोष पवार यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढून 54 पर्यंत गेली आणि त्यावेळी केलेल्या अँटीजेन टेस्ट मध्ये पवार हे पॉझिटिव्ह आले होते.त्यात त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पुरवठा कमी होत असल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया केली.कर्जत येथून शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका मधून पनवेलच्या दिशेने असताना संतोष पवार यांना ऑक्सिजन पुरवठा करणारा सिलेंडर मधील वायू संपल्याने ऑक्सिजन सिलेंडर बदलताना संतोष पवार यांचा ऑक्सिजन पुरवठा 10-15 मिनिटे बंद राहिल्याने त्यांचा तडफडून मृत्यू झाला होता.

शासनाच्या बेफिकीरीमुळे आपले वडील संतोष पवार यांचा मृत्यू झाला असून संबंधित आरोग्य यंत्रणेवर ठपका ठेवीत कारवाई करण्याची मागणी पवार यांच्या कुटुंबाने केली आहे.याबाबतचे पत्र दिवंगत संतोष पवार यांचे पुत्र मल्हार यांनी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे आरोग्य मंत्री,जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना धाडले आहे.त्यात त्यांनी आपले वडील संतोष पवार यांना सकाळपासून सुरू असलेला ऑक्सिजन सिलेंडर रुग्णाला नवी मुंबईत नेईपर्यंत पुरेल का?याची रुग्णालय अधीक्षक यांनी खात्री केली नाही आणि अर्धवट संपलेला सिलेंडर लावून रुग्णवाहिकेत पुढे नेण्यासाठी नेल्याने ही दुर्घटना घडली.
नवीन ऑक्सिजन सिलेंडर कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथून निघताना का लावला नाही.अर्धवट ऑक्सिजन सिलेंडर बाबत कर्जत उपजिल्हा रुग्णालय यांना कोणतीही कल्पना नव्हती का?की आपल्या कामात कसूर करीत आहे तो ऑक्सिजन सिलेंडर बदलण्याची तसदी घेतलीं नाही.शासनाची 108 क्रमांकाच्या रुग्णालयात प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी नेमले आहेत,तर मग त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑक्सिजन सिलेंडर बदलता येत नाही का?त्याचवेळी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेली कार्डिक रुग्णवाहिका फक्त शोभेसाठी उभी करून ठेवली आहे आणि त्या नवीन कोऱ्या कार्डिक रुग्णवाहिकेला स्टाफ आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशासनाने का दिला नाही?सुसज्ज 108 रुग्णवाहिकेत प्रशिक्षित स्टाफ नसेल तर मग त्याबाबत आम्हाला कुटुंबाला का कल्पना देण्यात आली नाही असे प्रश्न पवार यांच्या कुटुंबाने केलेल्या तक्रारीत केले आहेत.

दरम्यान,अशाच प्रकारची तक्रार कर्जत मधील सर्व पत्रकारांचे वतीने करण्यात आली आहे.संबंधित तक्रार पत्रकारांचे वतीने राज्याचे मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना करण्यात आली आहे आमच्या सहकाऱ्याचा शासनाच्या आरोग्य यंत्रणेमुळे नाहक जीव गेला असून त्याबाबत शासनाने संबंधित यांच्यावर कठोर कारवाई करावी ही मागणी पत्रकारांनी केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page