Thursday, March 28, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडसोशल मीडियावर हत्यारे घेऊन व्हिडीओ बनवणाऱ्या तीन भाईंना गुंडा पोलीस पथकाने घेतले...

सोशल मीडियावर हत्यारे घेऊन व्हिडीओ बनवणाऱ्या तीन भाईंना गुंडा पोलीस पथकाने घेतले ताब्यात…

पिंपरी चिंचवड : हातात तलवार , कोयते अशी शस्त्रे घेऊन व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या स्वयंघोषित तीन भाईंना गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे.

गुंड विरोधी पथकाने चिखली आणि आळंदी येथे दोन कारवाया करून तिघांना अटक केली आहे . त्यांच्याकडून 6 कोयते आणि 2 तलवारी जप्त केल्या आहेत . ओंकार उर्फ भिकू प्रशांत ठाकूर ( 18 , रा . माळवाडी , सोळू , खेड ) , अक्षय देविदास चव्हाण ( 23 , रा . जाधववाडी , चिखली ) या दोघांना ओंकार याच्या घराच्या वर असेलल्या कबुतराच्या ढाबळीमध्ये शस्त्र बाळगताना पोलिसांनी सोमवारी ( दि . 25 ) अटक केली . आरोपींनी शस्त्र घेऊन व्हिडीओ बनवले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले . हे व्हिडीओ गुंडा विरोधी पथकाच्या हाती लागताच पोलिसांनी दोघांना अटक केली.

गुंड विरोधी पथकातील पोलीस नाईक मयूर दळवी यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . आरोपी ओंकार आणि अक्षय या दोघांकडून दीड हजार रुपये किमतीचे चार कोयते आणि एक तलवार जप्त केली आहे.

त्याचबरोबर गुंडा विरोधी पथकाने दुसरी कारवाई जाधववाडी , चिखली येथे केली . या कारवाईमध्ये अक्षय उर्फ पप्पू महादेव खोजे ( वय 21 , रा . ओंकारनगर , जाधववाडी , चिखली ) याला अटक केली आहे . त्यानेही शस्त्र घेऊन व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक सुनील चौधरी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . आरोपीकडून पोलिसांनी दोन कोयते आणि एक तलवार असा 700 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे . गुंडा विरोधी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे . सोशल मीडियावर भाईगिरी , दहशत पसरवणारे व्हिडीओ अथवा इतर पोस्ट आढळल्यास पोलिसांकडून त्यावर कारवाई केली जात आहे . अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांवर पोलिसांचे बारीक लक्ष असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी सांगितले.

- Advertisment -

You cannot copy content of this page