Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडरायगड जिल्हा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दरडप्रवण क्षेत्रांचा व तळीये येथील पुनर्वसनाच्या कामाचा...

रायगड जिल्हा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दरडप्रवण क्षेत्रांचा व तळीये येथील पुनर्वसनाच्या कामाचा घेतला आढावा !

अलिबाग ( जिमाका ) : सध्याच्या मान्सून कालावधीमध्ये रायगड जिल्ह्याच्या दरडप्रवण भागांमध्ये नैसर्गिक आपत्तींच्या घटना घडल्यास तात्काळ मदत पोहोचविणे , स्थलांतरीत करण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करणे तसेच मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे दरडप्रवण गावांमध्ये दरड कोसळण्याची लक्षणे आढळतात किंवा कसे याची टेहळणी करण्यासाठी तसेच तेथील नागरिकांशी संपर्क साधून अतिवृष्टीच्या वेळी सतर्क राहणे व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी दि . 16 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ . महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून टेहळणी दिन ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली.

त्यानुसार जिल्ह्यातील उपवनसंरक्षक , निवासी उपजिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी , तहसिलदार, निवासी नायब तहसिलदार , गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी , नगरपरिषद / नगरपंचायत, उपविभागीय अभियंता, परिक्षेत्र वन अधिकारी , कृषी अधिकारी, उपअभियंता यांनी निरीक्षण करून त्या बाबी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आणून देणे , अशा विविध जबाबदाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांना नेमून दिल्या होत्या.

त्याप्रमाणे या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठरलेल्या दिवशी व ठरलेल्या वेळी या दरडप्रवण गावांना भेट दिली . या अधिकाऱ्यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला त्यांना दरडीची पूर्व लक्षणे , घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करून अतिवृष्टीच्या काळात सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले . त्यांना जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या तयारीची ,उपलब्ध साहित्य सामग्रीविषयीची माहिती दिली . तसेच त्यांच्याशी चर्चा करीत , त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबतची कार्यवाही देखील तात्काळ सुरु केली . या टेहळणी दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . पद्मश्री बैनाडे यांनी पोलादपूर तालुक्यातील दरडप्रवण गावांना भेट देऊन पाहणी केली . तसेच त्यांनी मौजे तळीये येथे भेट देऊन दरडग्रस्त गावाचे पुनर्वसन होत असलेल्या कामाची पाहणी करून तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

जिल्हा व स्थानिक प्रशासनातील प्रत्येक अधिकारी – कर्मचारी नागरिकांची सुरक्षितता व त्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत सदैव दक्ष आहेत , ग्रामस्थांनी अतिवृष्टीच्या काळात स्वतः ची काळजी घ्यावी , प्रशासन देत असलेल्या सूचनांचे पालन करावे व कोणत्याही आपात्कालीन प्रसंगी स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ . महेंद्र कल्याणकर यांच्यावतीने या दरडप्रवण भागात टेहळणी दिनानिमित्त टेहळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी येथील ग्रामस्थांना केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page