जेवरेवाडी गावात 149 मेंढ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू.. - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home महाराष्ट्र जेवरेवाडी गावात 149 मेंढ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू..

जेवरेवाडी गावात 149 मेंढ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू..

0
वाकसई प्रतिनिधी : अन्नातून विषबाधा झाल्याने 149 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील करंडोली, जेवरेवाडी येथे दि.28 ते 30 जानेवारी दरम्यान घडली. ह्या आपत्तीत गरीब मेंढपाळाचे सुमारे 20 लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने पशुसंवर्धन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने 125 शेळ्या मेंढ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
काळुराम शिवाजी बरकडे (मु. वनकुट ता. पारनेर जि. नगर) हे आपल्या बकऱ्यांचा वाडा घेऊन मावळ तालुक्यातील वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, वेहेरगाव, वरसोली या ठिकाणी शेतात बसत आणि उदरनिर्वाह करत आहेत. रविवारी वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी गावाच्या वरील बाजूला असलेल्या डोंगर भागात त्यांच्या बकऱ्यांच्या खाण्यात काहीतरी आल्याने रविवारी (दि. 28) मध्यरात्रीनंतर सोमवारी सकाळपर्यंत जवळपास 146 बकऱ्यांचा मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत हा आकडा 149 पर्यंत गेला.
शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागल्याने मेंढपाळांनी तात्काळ गावातील नागरिकांना कळवले. नागरिकांनी मदतीसाठी मावळ तालुका पशू वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेतले. वैद्यकीय पथकाने दोन दिवसांपासून बकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत. परंतू अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पशूधन दगावल्याने गरिब धनगर बंधूवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

‘आम्ही रात्रंदिवस फिरून शेळ्या मेंढ्यांचा मुलांप्रमाणे सांभाळ करतो. आमच्या संसाराचा गाडा त्यांच्यावर चालतो. विषबाधा झाल्याने 149 शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू झाला. शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी.’ – काळुराम बरकडे, मेंढपाळ
‘या कळपात एकून 403 शेळ्या आणि मेंढ्या होत्या. 28 जानेवारीला कुजून पडलेले शिळे अन्न शेळ्या, मेंढ्यांनी खाल्ले. त्यामुळे कळपातील काही मेंढ्याचे पोट फुगले, तोंडावाटे पाणी येऊ लागले. आम्ही तपासणी केल्यानंतर विषबाधेने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. आमच्या टीमने रात्रंदिवस उपचार केले. त्यामुळे 100 ते 125 शेळ्या मेंढ्यांचे प्राण वाचले. परंतू यामध्ये सुमारे 20 लाखांचे नुकसान झाले असून त्याबाबत अहवाल तहसीलदार यांना सादर केला आहे.’ – पशुसंर्वधन विकास अधिकारी..

You cannot copy content of this page

Exit mobile version