खोपोली ( दत्तात्रय शेडगे)
मंगळवारी झेनिथ धबधबा पाणी प्रवाहात दोन महिला व एक आठ वर्षाची मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. यातील मेहरबानू खान – 40 वर्षे व रुबिना वेळेवर – 40 वर्षे या दोन्ही महिलांचा मृत्यू देह मंगळवारी उशिरा मिळून आला मात्र आलमा जाफर शेख – वय 8 वर्षे या चिमुकलीचा शोध लागला नव्हता.
रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू ठेवूनही यश आले नाही .बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा पाताळगंगा नदीच्या खोपोली हद्दीपासून खाली आठ -दहा किमी अंतरात शोध मोहीम सुरू करण्यात आली.अखेर सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान सावरोली हद्दीत या चिमुकलीचा मृत्यूदेह नातेवाईकांना आढळून आला या मोहिमेत खोपोली अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक गृपचे सदस्य , खोपोली पोलीस व अग्निशमन दलाचे जवान सहभागी झाले.
पाच तुकड्या करून वरची खोपोली ते पुढे सावरोली पुल या दहा किमी अंतरात नदी पात्र , आजूबाजूची कपारे व झुडपे यांत कसून शोध घेण्यात आला.मात्र शेवटी तिच्या नातेवाईकांना सारसन भागात नदीच्या पात्रात आढळून आल्याने पाण्याचा प्रवाह व झाडेझुडपे असल्याने नातेवाईकांना तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत असताना मृतदेह पुढेपुढे सरकत सावरोली जवळ आल्याने बाहेर काढण्यात यश मिळाले या घटनेमुळे खोपोली शहरात हळहळ व्यक्त होत होती नातेवाईकांचा 15 जणांचा ग्रुप झेनिथ धबधब्या वर गेला असता तीन जण वाहून गेल्याचे समजताच सर्वत्र शोककळा पसरली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणा ही कामाला लागली त्यात अपघातग्रस्त टीम व सामजिक कार्यकर्त्याना दोन महिलांचा मृतदेह सापडला मात्र चिमुकली आलमा चा मृत्यूदेह सापडला नव्हता त्यामुळे या दुःखद घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खालापूर चे तहसीलदार आयुब तांबोळी खोपोली चे पोलीस निरीक्षक शिरीष पवार मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी घटनास्थळी पाहणी करून नातेवाईकांची ही भेट घेतली.
त्यानंतर आलमा चा मृतदेह शोधकार्यासाठी अपघातग्रस्त टीम बरोबर खोपोली अग्निशमक दल व नगरपालिका कर्मचारी टीम पातळगंगा नदीच्या पात्रात शोध घेत असताना तिच्या नातेवाईकांना आलमा चा मृतदेह मिळून आला घटनास्थळी तात्काळ खोपोली पोलीस ,खालापूर पोलीस दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन प्रक्रिये साठी पाठविले.