अतिवृष्टी होणार असल्याने कर्जत बाजारपेठ बंदचा आदेश..

0
335

मात्र अनेक दुकाने उघडी,तर अनेकांना आदेशाची माहितीच नव्हती..

(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
कर्जत भारतीय हवामान विभागाने दिनांक ९ जून ते १२ जुन २०२१ रोजी रायगडमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली असताना काल पासूनच कर्जतमध्ये पावसाला सुरुवात झाली होती.दिवसभर संततधार पावसामुळे पुढे संभाव्य धोका टाळण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दि.१० ते ११ जून ला सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होतेे.

फक्त दवाखाने व मेडिकल दुकाने चालू असतील असे आदेशात नमुद केले असताना कर्जतमधील अनेक दुकाने आज चालू असलेली दिसल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला.भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दि.९ ते १२ जून २०२१ ला अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिलेला होता,म्हणूनच रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संबंधित जिल्ह्यातील अधिका-यांना सावध राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर काल उशिरा त्यांनी आदेश काढून अतिवृष्टी व जोराचा वारा वादळ होणार असल्याने नागरिकांनी बाजारपेठेत अथवा घराच्या बाहेर पडू नये,म्हणून संपूर्ण बाजारपेठा देखील बंद ठेवण्याचे आदेश काढले होते.फक्त दवाखाने व मेडिकल दुकाने उघडी असणार होते.मात्र हा आदेश अनेक किरकोळ दुकानदारांना माहीत नसल्याने आज दि.१० जून २०२१ रोजी सकाळी अनेकांनी आपली दुकाने कर्जत बाजारपेठेत उघडली . मात्र कर्जत पोलिसांनी याबाबतीत सर्वांना समज देऊन दुकाने बंद करण्यात आली.

मात्र आणलेला भाजीचा माल काय करायचा ? म्हणून दुकानदार दुकाने उघडत असल्याची अनेकांची ओरड आहे , तर कर्जत – किरवली येथे असणारे ” डी मार्ट ” हे देखील उघडे असल्याचे दिसून आले.

कर्जत बाजारपेठेत रोज अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने उघडी असल्यावर रोजच अनेकांवर कर्जत पोलीस ठाणे गुन्हे नोंद करत असताना जिल्हाधिकारी यांचा आदेश अनेकांपर्यंत पोहचला नसल्याने उघडलेली दुकाने पोलीस ठाणे बंद करत असताना मात्र ते निघून गेल्यावर पुन्हा दुकाने उघडली जात असल्याची ओरड कर्जत बाजारपेठेत होत असताना दिसत आहेत.तरी दुकानदारांनी आदेशाची अंमलबजावणी करावी , अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.