Monday, April 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअनुसुचित जाती जमाती विभागामार्फत सेवानिवृत्त झालेल्याना सेवानिवृत्तीचा लाभ मिळावा-आमदार रमेश...

अनुसुचित जाती जमाती विभागामार्फत सेवानिवृत्त झालेल्याना सेवानिवृत्तीचा लाभ मिळावा-आमदार रमेश पाटील…

खोपोली (दत्तात्रय शेडगे)
अनुसूचित जमाती प्रवर्गात केंद्रशासन व केंद्र शासनाचे इतर अंगीकृत विभागांमधून सेवानिवृत्त झालेल्या पण सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या कोणतेही लाभ न मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या समस्यां बाबत कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार माननीय रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोपरखैरणे, नवी मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो कर्मचारी उपस्थित होते .बैठकीच्या सुरुवातीला कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष अँड. चेतन पाटील यांनी प्रास्ताविक केले.


यावेळी अनुसूचित जमाती प्रवर्गातील केंद्र शासनाच्या व केंद्र शासनाचे इतर विभागातून सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून दोन महिन्यापूर्वी कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे मंत्री महोदयांची भेट घेतली. यावेळी संसदीय आदिवासी कल्याण समितीचे चेअरमन माननीय खासदार किरीट सोलंकी यांनी महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीचे कर्मचारी जे केंद्र शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांची यादी तसेच त्यांचे प्रश्न याची यादी तयार करण्यास सांगितले आहे.जेणेकरून त्याचां प्रलंबित निवृत्ती वेतनाचा व निवृत्तीनंतर देय असलेले लाभ हे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यास मदत होईल.

म्हणून आजची ही बैठक आयोजित केल्याचे ॲड. चेतन पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोळी महासंघाचे सरचिटणीस माननीय राजहंस टपके यांनी कोळी महासंघाने अनुसूचित जमातीतील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोळी महासंघाच्या वतीने नवी दिल्ली येथे केलेल्या दौर्‍याची संपूर्ण माहिती दिली .तसेच विधीतज्ञ माननीय सचिन ठाणेकर व माननीय नितीन नागपुरे यांनी सर्व कायदेशीर बाबी अनुसूचित जमाती प्रवर्गातील उपस्थित कर्मचारी बांधवांना सांगितल्या या बैठकीस मुंबई ,रायगड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, जळगाव ,नाशिक ,अकोला ,लातूर नांदेड ,कोल्हापूर ,सांगली ,सोलापूर, पुणे, सातारा अशा अनेक जिल्ह्यातून उपस्थित असणाऱ्या अनेक समाज बांधवांनी आपल्या समस्या व मते या बैठकीमध्ये मांडली.

यावेळी कोळी महासंघ हा कोळी समाजातील तसेच इतर अन्यायग्रस्त आदिवासी अशा सर्व बांधवांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या ४ वर्षापासून हा सेवानिवृत्त वेतनाचा प्रश्न प्रलंबित असून हा प्रश्न कोळी महासंघाच्या माध्यमातून लवकर सोडविण्यासाठी लढा देऊ. तसेच हे आपले प्रश्न सोडविण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकसंघ झाले पाहिजे असे आमदार रमेशदादा पाटील यांनी सर्व समाज बांधवांना आव्हान केले.


तामिळनाडू, केरळ व इतर राज्यांना संसदीय समितीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे महाराष्ट्र राज्यासाठीही तशा मार्गदर्शक सूचना लागू करून घेण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आम्ही दिल्ली येथे केंद्रीय आदिवासी विकास मंत्री माननीय अर्जुन मुंडा व संसदीय समितीचे अध्यक्ष माननीय खासदार किरीट सोलंकी यांची भेट घेतली असून हा प्रलंबित निवृत्ती वेतनाचा प्रश्न लवकरच सोडवू असे आमदार रमेशदादा पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, उपनेते श्री.देवानंद भोईर, विधीतज्ञ सचिन ठाणेकर ,श्री. नितिन नागपुरे, कोकण विभाग अध्यक्ष अभय पाटील, .सुभाष कोळी, यशवंत पाटील, अविनाश भोईर, पांडुरंग चौले,रोहिदास कोळी, राजा सोंडकर अर्जुन मेस्त्री इ. मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page