लोकल प्रवाशांच्या सर्व समस्या सोडविण्यास बांधील : बापूसाहेब भेगडे..
प्रतिनिधी – श्रावणी कामत.
तळेगाव दाभाडे : अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी लोणावळा ते आकुर्डी आणि आकुर्डी ते तळेगाव स्टेशन असा लोकल प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी प्रवाशांनी आपल्या समस्या मांडत त्या सोडविण्यासाठी तुम्ही आमदार व्हायलाच हवे. त्यासाठी आम्ही सर्व नोकरदार, व्यावसायिक, महिला, तरुण वर्ग आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा विश्वास दिला. बापूसाहेब भेगडे यांनी सर्वांच्या मागण्या ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचा विश्वास दिला.
लोकल प्रवाशांनी सांगितले, की आम्ही कामावर सकाळी जातो आणि सायंकाळी घरी येतो. त्यामुळे आमच्या समस्या, मागण्या कुणाकडे मांडायच्या हे कळत नव्हते. बरे झाले तुम्ही स्वतःहून आमच्याकडे आलात. आमच्याकडे लक्ष देणारे कुणीतरी आहे, हे पाहून छान वाटले. आमच्या सर्व मागण्या तुम्ही आमदार झाल्यावर पूर्ण होतील, असा विश्वास वाटतो. आमचं मत आपल्यालाच आहे, असे आश्वासनही यावेळी प्रवाशांनी दिले.
बापूसाहेब भेगडे यांनी यावेळी प्रवाशांना आश्वासन दिले, की लोणावळा ते पुणे स्टेशन दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा 100 टक्के प्रयत्न करणार आहे. रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन यासंदर्भात केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून हा प्रश्न सोडविणार आहे. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्यांना तळेगावमध्ये थांबा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात कायमस्वरूपी महिला सुरक्षारक्षक असावेत, यासाठी रेल्वे पोलिसांशी चर्चा करून हा प्रश्न सोडविणार आहे.